सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर अंकिता वालावलकर सध्या चर्चेत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे यांसह इतरही क्रिएटर्सने हजेरी लावली होती. राज ठाकरेंच्या कंटेन्ट क्रिएटर्सच्या भेटीवेळी शर्मिला ठाकरे व मनसे नेते अमेय खोपकरही उपस्थित होते.
राज ठाकरे भेटीतील अंकिता वालावलकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंकिताने मनसेसाठी राज ठाकरेंसमोरच मालवणी गाऱ्हाणं घातलं आहे. “आज या ठिकाणी आम्ही सगळे जण जमलेलो असा…ते सगळेजण तुला गाऱ्हाणं घालतो ते मान्य करुन घे रे महाराजा…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप उत्तरोत्तर वाढत जाऊं दे रे महाराजा… मनसेच्या इरोधात जर कुणी काय केला असात वाकडानाकडा…तर त्याचो डाव त्याचारचं उलटां दे रे महाराजा… होय महाराजा ! बारामताचं गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर…हिकडचं आमदार हिकडचं ऱ्हवांदे , पण तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा”, असं गाऱ्हाणं अंकिताने घातलं आहे.
हेही वाचा>> Video: “१० रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर…” चाहत्यांच्या घोषणेनंतर अभिनेत्रीला हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंकिताचा मालवमी गाऱ्हाणं गातानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अंकिताने मालवणी गाऱ्हाणं घातल्यानंतर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हसू आल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे अंकिताचं गाऱ्हाणं राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याही पसंतीस उतरलं आहे.
हेही वाचा>> पोटनिवडणुकीचा एमसी स्टॅनला फटका! रॅपरच्या पुण्यातील कॉन्सर्टची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार इव्हेंट
अंकिता वालावलकर सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. अंकिता फूड, पर्यटन याविषयी व्हिडीओ बनवते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे इन्स्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. सोशल स्टार म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या अंकिताने नुकतीच चला हवा येऊ द्या या शोमध्येही हजेरी लावली होती.