चित्रपटाने केवळ मनोरंजन करू नये तर समाजातील दु:ख, दारिद्रय़, वेदना, व्यथा, शोषित वर्गाचे जगणे, हेही मांडावे, त्यात सामाजिक भान असावे, असे म्हणणे कितीही योग्य असले तरी प्रत्येक वेळी ते गणित यशस्वी होईलच असे नाही. काही वर्षांपूर्वी विनोदी चित्रपटांची अशीच लाट आली तेव्हाही अपवाद वगळता प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना नाकारले होते. तारतम्य बाळगले नाही आणि ऊठसूट तयार करा सामाजिक आशयाचा चित्रपट, असे झाले तर जे तथाकथित विनोदी चित्रपटांच्या बाबतीत घडले तसेच अशा सामाजिक आशय असलेल्या, चाकोरीबाहेरच्या चित्रपटांबाबतही घडेल आणि असे चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटाच्या परिवर्तनाची लाट न ठरता तो केवळ बुडबुडाच राहील..
चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्याने समाजाचे प्रबोधन केले पाहिजे, आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजे, असे नेहमी म्हटले जाते. समांतर किंवा चाकोरीबाहेरील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सत्यजित राय यांनी ‘चित्रपटाच्या निमित्ताने मला खरा भारत समजून घेता आला’ असे म्हटले होते. तर ‘७२ मैल- एक प्रवास’ हा चित्रपट ज्या अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे, त्या कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी अभिनेता नाना पाटेकर यांनी या कादंबरीचे ‘सळसळत येणारी वेदना’ असे वर्णन केले होते. विनोदी, कौटुंबिक चक्रात अडकलेल्या मराठी चित्रपटांनी सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करून मोकळा ‘श्वास’ घेतला असला आणि अशा प्रकारचे काही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असले तरी ही लाट आहे की फक्त बुडबुडा, हे येणारा काळच ठरविणार आहे.  
निखळ मनोरंजन आणि मसाला असलेले चित्रपट चालतात आणि सामाजिक आशय, शोषितांचे दु:ख असे विषय असणारे चित्रपट फारसे चालत नाहीत, ते फक्त महोत्सवापुरतेच मर्यादित राहतात, असे चित्र अगदी आत्तापर्यंत होते. मात्र गेल्या काही वर्षांत ते बदलले असून सामाजिक आशय, शोषितांच्या वेदना, सवर्ण आणि दलित जातीतील संघर्ष किंवा एकदम वेगळ्या विषयांवरील चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाज किंवा प्रेक्षकांच्या अभिरुचीत अचानक असा बदल झाला की ते चित्रपट खरोखरच सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारे आणि मनाला भावणारे होते, म्हणून ते चालले? असा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फॅन्ड्री’चे सर्व स्तरांतील प्रेक्षकांनी चांगले स्वागत केले. देवीला वाहण्यात येणाऱ्या मुला-मुलींची अनिष्ट रुढी (जोगता आणि जोगतीण) व त्याविरोधातील संघर्ष असलेला ‘जोगवा’ चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ‘७२ मैल- एक प्रवास’ हा चित्रपटही वेगळ्या बाजाचा होता. ‘सत ना गत’ या चित्रपटात गरिबांच्या दु:खावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या प्रवृत्तीचे चित्रण होते. एके काळी तमाशाप्रधान बाजात अडकलेला मराठी चित्रपट बाहेर पडला आणि विनोदी व कौटुंबिक बाजात अडकला. ‘श्वास’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटात एक वेगळा विषय हाताळला गेला आणि अलीकडच्या काळात मराठी चित्रपटाच्या नव्या बदलाची ती नांदी ठरली. त्या अगोदरही ‘प्रभात’ने आणि त्यानंतर अन्य काही जणांनी वेगळ्या बाजाचे आणि आशयाचे चित्रपट दिले होते, हे विसरून चालणार नाही. यात ‘शेजारी’, ‘कुंकू’, ‘माणूस’ आदींचा तर आवर्जून उल्लेख करावाच लागेल. मतिमंद मुलांचे भावविश्व आणि समस्या मांडणारा ‘चौकट राजा’, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला ‘शापित’, त्यापूर्वी येऊन गेलेला आदिवासींच्या जीवनावरील ‘जैत रे जैत’, परितक्त्या महिला आणि त्यांचे प्रश्न मांडणारा डॉ. जब्बार पटेल यांचा ‘उंबरठा’ तसेच अमोल पालेकर यांचे ‘आक्रीत’, ‘कैरी’, सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांचा ‘दोघी’, ‘देवराई’, विहीर’, ‘गाभ्रीचा पाऊस’ हेही वेगळ्या विषयांवरील चित्रपट होते. या चित्रपटांनीही एक प्रकारे सामाजिक आशय आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घातला होता.   
‘फॅन्ड्री’ला मिळालेल्या यशामुळे असे चित्रपटही चालू शकतात, असा विश्वास चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये निर्माण झाला आहे. योगायोग म्हणा किंवा आणखी काही, पण येत्या काही महिन्यांत सामाजिक आशय असणारे असे चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत किंवा झाले आहेत. ‘भाकर’ या चित्रपटात कर्जबाजारी शेतकरी, त्याचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या असा विषय हाताळण्यात आला आहे, तर ‘जयजयकार’ या चित्रपटात तृतीयपंथीयांचे जीवन व त्यांच्या प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते आणि तेही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतात, असा सकारात्मक विचार यात मांडण्यात आला आहे. ‘भाकरखाडी ७२ किलोमीटर’मध्ये तरुण होतकरू डॉक्टर, त्याच्या स्वप्नांचा झालेला चक्काचूर, यातून त्याला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देऊन त्याच्या आत्मशोधाची कहाणी सांगितली होती. तर ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांच्या ‘म्हादू’ या लघुकथेवर आधारित याच नावाच्या आगामी मराठी चित्रपटात आदिवासींचे कुपोषण, आहे रे आणि नाही रे वर्गातील संघर्ष याचे चित्रण पाहायला मिळणार आहे.
नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा बाज असलेले चित्रपट चालले म्हणून तशाच प्रकारचे अन्य चित्रपटही चालतीलच असे वाटण्याला काहीही अर्थ नाही. चित्रपटाची कथा-पटकथा सशक्त असली तरी दिग्दर्शन, चित्रपटाची मांडणी, कलाकार यावरही बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे अमुक एक केले म्हणजे चित्रपट यशस्वी झाला, असा ‘फाम्र्युला’ असा असूच शकत नाही. प्रेक्षकांना गृहीत धरूनही चित्रपटाची निर्मिती केली जाऊ नये. कारण अमुक एक सामाजिक आशय, शोषितांचे दु:ख, वेदना असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले म्हणून तशाच प्रकारच्या अन्य चित्रपटांनाही ते डोक्यावर घेतील, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. ते भान चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच वेगवेगळ्या महोत्सवात चित्रपटाला खूप पारितोषिके मिळाली किंवा चित्रपटाने खूप पैसे कमावले म्हणजे तो चित्रपट चांगला असे कोणी मानू नये. डोळ्यातून पाणी आणणारे कौटुंबिक चित्रपट, अंगविक्षेपांनी/ कमरेखालच्या विनोदांनी हसवणूक करणारे विनोदी चित्रपट किंवा शोषितांच्या वेदना मांडणारे सामाजिक आशयाचे चित्रपट अशी वर्गवारी करण्यापेक्षा जो चित्रपट आपल्याला भावतो, समाजातील वास्तवतेचे दर्शन घडवितो, चित्रपटातील पात्रांशी आपण एकरूप होतो, आपण आपलेच रोजचे जगणे ज्यात पाहतो आणि जो थेट आपल्या जीवनाला भिडतो, तो चांगला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मग अशा चित्रपटात सामाजिक आशय, वेदना, वंचितांचे जगणे असलेच पाहिजे असे नाही.  
चित्रपटाने केवळ मनोरंजन करू नये तर समाजातील दु:ख, दारिद्रय़, वेदना, व्यथा, शोषित वर्गाचे जगणे, हेही मांडावे, त्यात सामाजिक भान असावे, असे म्हणणे कितीही योग्य असले तरी प्रत्येक वेळी ते गणित यशस्वी होईलच असे नाही. एकापाठोपाठ एक त्याच बाजाचे चित्रपट आले तर प्रेक्षकही त्यांना नाकारण्याचीच शक्यता आहे. कारण काही वर्षांपूर्वी विनोदी चित्रपटांची अशीच लाट आली तेव्हाही अपवाद वगळता प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना नाकारले होते. तारतम्य बाळगले नाही आणि ऊठसूट तयार करा सामाजिक आशयाचा चित्रपट, असे झाले तर जे तथाकथित विनोदी चित्रपटांच्या बाबतीत घडले तसेच अशा सामाजिक आशय असलेल्या, चाकोरीबाहेरच्या चित्रपटांबाबतही घडेल आणि असे चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटाच्या परिवर्तनाची लाट न ठरता तो केवळ बुडबुडाच राहील, हे नक्की.