सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये भलेही ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले नसले तरी तिने साकारलेल्या व्यक्तिरेखा मात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या होत्या. कुणाल खेमूशी लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर झाली होती. मात्र आई झाल्यानंतर तिने स्वतःला कामापासून पूर्णपणे दूर केले होते. पण आता ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसत आहे. सध्या ‘हुश्श हुश्श’ मधील तिच्या व्यक्तिरेखेची चर्चा आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोहा अली खानने तिच्या करिअरमधील चढउतारांवर भाष्य केलं.
सोहा अली खान प्रदीर्घ काळानंतर वेब सीरिजच्या माध्यामातून अभिनय क्षेत्रात परतली आहे. नुकतीच ती ‘कौन बनेगा शिखरवती’ या कॉमेडी ड्रामामध्ये दिसली होती. ज्यामध्ये त्याच्यासह लारा दत्ता, कृतिका कामरा, अन्या सिंह, नसीरुद्दीन शाह आणि रघुबीर यादव दिसले होते. नुकतीच तिची नवीन वेब सिरीज ‘हुश्श हुश्श’ प्रदर्शित झाली आहे.
आणखी वाचा- तुषार कालिया ठरला ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता, ट्रॉफी अन् कारसह जिंकली ‘एवढी’ रोख रक्कम
करिअरची दुसरी इनिंग एन्जॉय करत असलेल्या सोहा अली खानला एका गोष्टीची खंत आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, आई झाल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीतून घेतलेला दोन वर्षांचा ब्रेक हा सर्वात वाईट निर्णय होता. सोहा सांगते, “जेव्हा मी आई झाले तेव्हा माझे पहिले प्राधान्य माझ्या मुलीला वेळ देणे होते. महिलांना नेहमीच मल्टीटास्कर म्हटले जाते पण मी एका वेळी एक गोष्ट करू शकते. पण मी असं करून चूक केली असे मला वाटते. आई होण्यासोबतच तुमची इतर ओळखही जपली पाहिजे. हे समजायला मला दोन वर्षे लागली.”
सोहा अली खानने पुढे सांगितले, “जेव्हा मला समजले की माझ्याकडून चूक झाली आहे, तेव्हा मी नव्याने सुरुवात केली. मी पुन्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली. यासोबतच मित्रांना भेटणे, फिरणे, लिहिणे, बॅडमिंटन खेळणे, वर्कआऊट करणे या सर्व गोष्टी सुरू केल्या ज्याने मला खूप आनंद मिळाला.”
आणखी वाचा- Photos: कुणाल खेमू-सोहा अली खानचे मुंबईतील आलिशान घर पाहिलेत का? किंमत आहे तब्बल इतके कोटी रुपये
सोहा म्हणते की, “आपली इच्छा असते की आपण सगळीकडेच असायला हवं आणि सर्वकाही एकाच वेळी मॅनेज करावं पण तसे होऊ शकत नाही. जेव्हा मी कामावर असते तेव्हा मला माझ्या मुलीबद्दल वाईट वाटते की ती एकटी आहे. माझ्याप्रमाणे तिला कोणीही व्यवस्थित खाऊ घालू शकत नाही. पण एकाच वेळी सर्व काही करणे शक्य नाही. पती, मुलं आणि घर सांभाळण्यासाठी महिला खूप कष्ट करतात.”