अभिनेत्री कंगना रणौत मागील काही आठवड्यांपासून सतत चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या कंगनाविरोधात शिवसेना असा वाद साऱ्या देशाने मागील आठवड्यामध्ये पाहिला. मात्र आता कंगनाने पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाचा या इच्छेशी काहीही संबंध नाहीय. ही भेट आपल्याला चित्रपटसृष्टीमधील नवकलाकार आणि कामगारांसंदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी घ्यायची असल्याचे कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने ट्विटरवरुन ही इच्छा व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये कंगनाने विद्यामान पंतप्रदान नरेंद्र मोदींचा थेट उल्लेख मात्र टाळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार जया बच्चन यांनी यांनी सोशल मीडियावर इंडस्ट्रीबद्दल आक्षेपार्ह भाषेत होणाऱ्या टीकेचा विरोध केला असून अशा भाषेचा वापर केला जाऊ नये असं सरकारकडून सांगण्यात यावं, अशी विनंती केली आहे. याच भाषणादरम्यान जया यांनी इंडस्ट्रीला नाव ठेवणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यावरुनच कंगनाने या ठिकाणी अभिषेक किंवा तुमची मुलगी असती तरी असं म्हटलं असता का असा सवाल केला. यावर एका महिला प्राध्यापकाने जयाजी सर्व इंडस्ट्रीला बाजूने बोलत असून तू स्वत:ला वेगळी का समजतेस असा प्रश्न कंगनाला विचारला. या प्रश्नला उत्तर देताना कंगनाने, “हे म्हणजे बलात्कार केला तर काय झालं खायला तर दिलं असा विचार तुम्ही मांडत आहात का? अनेक प्रोडक्शन हाऊसेसमध्ये एचआर विभागच अस्तित्वात नाही जिथे एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल करु शकेल. आठ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल कोणतीही काळजी घेतली जात नाही,” असं कंगनाने म्हटलं आहे.

याच संदर्भात पुढे बोलताना अन्य एका ट्विटमध्ये कंगनाने, “गरिबांना खायला मिळालं की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या हा विचार बदलण्याची गरज आहे. गरिबाला खाण्याबरोबर सन्मान आणि प्रेमाचीही गरज आहे. ज्युनियर आर्टीस्ट आणि या इंडस्ट्रीमधील कामगारांसाठी काय काय करता येईल याबद्दलची संपूर्ण यादीच माझ्याकडे आहे. कधीतरी मला माननिय पंतप्रधानांना भेटायची संधी मिळाली तर यावर मी नक्की चर्चा करेन,” असं म्हटलं आहे.

जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा चित्रपट सृष्टीमधील बदलांसंदर्भातील यादी मी संबंधित अधिकाऱ्यांना देईल. यामधून इतरांनाही त्यांच्या ओळखीच्या क्षेत्रातील गरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल असंही कंगनाने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जया यांनी कंगनाच्या त्या वक्तव्यावर नोंदवला आक्षेप

आज राज्य सभेच्या सभागृहात शून्य प्रहराला जया बच्चन यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या. याआधी अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडला ‘गटार’ म्हटलं होतं. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्सच्या अधीन गेल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some day if i meet prime minister i will discuss reforms for workers and junior artists says kangana ranaut scsg