सासू आणि सुनेत सतत भांडणे होत राहतात, असे आपण ऐकत आलो आहोत. नवरा-बायको आणि सासूच्या नात्यात तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी गंमत असतेच, पण त्याचसोबत सासू आणि सुनेचेही काही वेगळे नाते असू शकते हे फारसे दाखवले जात नाही. दिल्लीच्या एका छोटय़ाशा भागात राहणाऱ्या सुमन (अमृता सुभाष) यांची कथाही काहीशी अशीच आहे. स्वत: घटस्फोटित असेलली सुमन आपल्या सासूसह राहते आहे. तिची मुलं पतीबरोबर  (अनुप सोनी) वास्तव्यास असतात. या एकटेपणातून स्वत:ला सावरत सुमन स्वत:चा छोटेखानी व्यवसाय सुरू करायचा निर्धार करते. लोणच्यांचा व्यापार करण्यासाठी ठिकठिकणी फिरणाऱ्या सुमनला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. तिची लोणचीही कोणी विकत घेत नाहीत. या सगळय़ात तिला खंबीरपणे साथ मिळते ती तिच्या सासूची (यामिनी दास). कडवा भूतकाळ पाठलाग करत असतानाही संसारात एकटी पडलेली सुमन आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करते. आपल्या मुलांची मनं जिंकायचा प्रयत्न करते. सासूच्या मदतीने आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या सुमनची जिद्द फळाला येईल का, आपल्या मुलांच्या नजरेत ती स्वत:ला उंचवू शकेल का.. अशा अनेक गोष्टींचा उलगडा ‘सास बहू आचार प्रा. लि.’ या वेबमालिकेतून रसिकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे लेखन-दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे.

कधी – प्रदर्शित ,  कुठे – झी ५

कलाकार -अमृता सुभाष, आनंदेश्वर द्विवेदी, अनुप सोनी, यामिनी दास, निखिल चावला.

द गॉन गेम २

‘द गॉन गेम’च्या पहिल्या सीझनमध्ये गुजराल परिवार आणि त्याभोवती फिरणारे गुन्हेगारीचे चक्रव्यूह प्रेक्षकांसमोर आले होते. या दुसऱ्या सीझनमध्ये एका नव्या प्रकरणात गुजराल कुटुंबीय अडकले असून या भागात गुन्हेगारीचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. सुहानी आपला पती साहिल जिवंत असल्याचे आपल्या सासरच्यांना सांगते आणि अचानक ते सुहानीला मारायचा प्रयत्न करतात. त्यात शर्मिला गुप्ता या सीबीआयची अधिकाऱ्याकडे सुहानीच्या मृत्यूचा तपास दिला जातो, परंतु गुजराल परिवाराने सुहानीला का मारले? त्याआधी काय घडले? याचा तपास आणि त्यातून उलगडणारे नाटय़ ‘द गॉन गेम’च्या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. साहिलचा खून कोणी केला, तो गुजराल परिवारानेच घडवून आणला की सुहानीनेच त्याचा खून केला? या सगळय़ाची उत्तरं या सीझनमधून मिळणार आहेत. या मालिकेचे लेखन झ्र् दिग्दर्शन निखिल भट यांनी केले आहे.

कधी – प्रदर्शित  कुठे – वूट

कलाकार – श्रिया पिळगावकर, अर्जुन माथुर, श्वेता त्रिपाठी, दिब्येंदू भट्टाचार्या, हरलिन सेठी आणि संजय कपूर

रणवीर व्हर्सेस वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स 

आत्तापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या सुप्रसिद्ध डिस्कव्हरीच्या कार्यक्रमातून सहभाग घेतला आहे. यावेळी यात बॉलीवूडचा नायक रणवीर सिंग अवतरणार आहे. या सीझनमध्ये जंगलसफारीचे अनेक भाग, रोमांचित करणाऱ्या कसरती, निसर्ग आणि रणवीरच्या बेयरसोबतच्या आगळय़ावेगळय़ा गप्पा या वेबमालिकेतून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जंगलात रणवीर कुठे कुठे जाणार, कोणती आव्हाने यशस्वीरीत्या पेलणार आणि कुठल्या नव्या जागांचा या मालिकेतून शोध लागेल अशा अनेक गोष्टींचा थरार चाहत्यांना ‘रणवीर व्हर्सेस वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स’ या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन शंतनू श्रीवास्तव यांनी केले असून दिग्दर्शन खुजेमा हवेलीवाला यांनी केले आहे.

कधी – प्रदर्शित  कुठे – नेटफ्लिक्स

कलाकार – रणवीर सिंग, बियर ग्रेल्स

स्ट्रेन्जर थिंग्ज ४

स्ट्रेन्जर थिंग्ज या बहुचर्चित मालिकेच्या चौथ्या भागाचे शेवटचे दोन भाग प्रदर्शित झाले असून वेक्नाभोवती फिरणारे कथानक आणि वेक्ना या पात्रासह इलेव्हन, हॉपर, जॉयेस या मुख्य पात्रांची ससेहोलपट यात पाहायला मिळणार आहे. वेक्ना हाच नंबर वन आहे, याचा साक्षात्कार इलेव्हनला झाला आहे. त्यामुळे नंबर वन विरुध्द इलेव्हन असा हा सामना मुख्यत्वाने पाहायला मिळणार आहे. इलेव्हनसोबत कैदेत असणारा हेन्री नावाचा मुलगा त्याच्यातील दुष्ट शक्तींमुळे ‘वेक्ना’ बनतो आणि दुसऱ्या जगातून तो पृथ्वीवर राज्य करण्याची स्वप्न बघतो. दुष्ट लोकांना मारून तो आपला बदला घेतो. इलेव्हन आणि माईकचे पुन्हा एकत्र येणे, विल-माईक-डस्टिन आणि लुकस ही चौकडी एकत्र येणार का? हॉपरचे पुढे काय होणार आणि सगळय़ात महत्त्वचं म्हणजे वेक्नाच्या दुष्ट हेतूपासून इलेव्हन हॉकिन्सला वाचवू शकेल का? अशा प्रश्नांची उत्तरं या दोन भागांत पाहायला मिळणार आहे. 

कधी –  प्रदर्शित कुठे – नेटफ्लिक्स

कलाकार –  मिली बॉबी ब्राऊन्स, डेव्हिड हार्बर, फिन वुल्फहार्ड, विओना रायडर.