सासू आणि सुनेत सतत भांडणे होत राहतात, असे आपण ऐकत आलो आहोत. नवरा-बायको आणि सासूच्या नात्यात तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी गंमत असतेच, पण त्याचसोबत सासू आणि सुनेचेही काही वेगळे नाते असू शकते हे फारसे दाखवले जात नाही. दिल्लीच्या एका छोटय़ाशा भागात राहणाऱ्या सुमन (अमृता सुभाष) यांची कथाही काहीशी अशीच आहे. स्वत: घटस्फोटित असेलली सुमन आपल्या सासूसह राहते आहे. तिची मुलं पतीबरोबर (अनुप सोनी) वास्तव्यास असतात. या एकटेपणातून स्वत:ला सावरत सुमन स्वत:चा छोटेखानी व्यवसाय सुरू करायचा निर्धार करते. लोणच्यांचा व्यापार करण्यासाठी ठिकठिकणी फिरणाऱ्या सुमनला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. तिची लोणचीही कोणी विकत घेत नाहीत. या सगळय़ात तिला खंबीरपणे साथ मिळते ती तिच्या सासूची (यामिनी दास). कडवा भूतकाळ पाठलाग करत असतानाही संसारात एकटी पडलेली सुमन आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करते. आपल्या मुलांची मनं जिंकायचा प्रयत्न करते. सासूच्या मदतीने आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या सुमनची जिद्द फळाला येईल का, आपल्या मुलांच्या नजरेत ती स्वत:ला उंचवू शकेल का.. अशा अनेक गोष्टींचा उलगडा ‘सास बहू आचार प्रा. लि.’ या वेबमालिकेतून रसिकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे लेखन-दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा