चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊच हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. लैंगिक अत्याचाराविरुद्ध अनेक अभिनेत्रींनी त्यांचं मत मांडलं आहे. अभिनेत्री विद्या बालननेही या विषयावर एका कार्यक्रमात सविस्तरपणे भाष्य केलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका शोभा डेसुद्धा उपस्थित होत्या. मात्र, विद्याने मांडलेली मतं गायिका सोना मोहपात्राला फारशी रुचली नाही. ट्विटरच्या माध्यमातून सोनाने सडेतोड शब्दांत विद्यावर टीका केली.

कार्यक्रमात विद्या म्हणालेली की, ‘मी गेल्या १२ वर्षांपासून या क्षेत्रात आहे, पण मला असे प्रस्ताव कधीच आले नाहीत. मला असुरक्षित वाटण्याजोगे कोणी वक्तव्ये करावीत अशी संधी मी आजपर्यंत दिली नाही. मला एखाद्या गोष्टीचा संशय आला, तर मी लगेच तेथून दूर व्हायचे. कुटुंबियांसोबत राहत असल्याने मला जेवण किंवा घरभाड्याची कधी चिंता करावी लागली नाही. त्यामुळे मी कामासाठी हतबल नव्हते.’

‘इतरांना मी कमकुवत, निराश किंवा हतबल वाटेन असं कधीच मी वागले नाही. लोकांना या गोष्टीची मी खात्री करून दिली की, जे काम मला मिळेल त्यात मी सर्वोत्तम कामगिरी करेन, पण काम मिळण्यासाठी मी हतबल नाही,’ असंही ती म्हणाली.
विद्याच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सोनाने ट्विटरच्या माध्यमातून तिला खडेबोल सुनावले. तुमच्यासोबत गैरप्रकार किंवा तुमच्यावर बलात्कार तेव्हाच होतो म्हणजे तुम्ही कमकुमत, उपाशी आणि कामासाठी हतबल असतात,’ असा अर्थ विद्याच्या बोलण्यातून प्रतीत असल्याचे सोनाने म्हटले.

वाचा : भारतात ‘या’ गाण्याची क्रेझ अजूनही; तब्बल ५० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार 

सोनाने यापूर्वीही काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मतांवर आक्षेप घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली. आता तिच्या या ट्विटवर विद्या बालन काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader