मस्त बेधुंद वातावरणात चित्रित होणारे दृश्य, सगळ्यांचे डोळे स्वीमिंग पूलमधून बाहेर येणाऱ्या नायिकेकडे खिळलेले.. सवयीप्रमाणे बिकीनीत किंवा फारतर स्वीमसूटमध्ये दिसेल एखादी ललना अशी अपेक्षा. पण, प्रत्यक्षात बाहेर येते साडीतली ललना आणि मग जो काही भ्रमनिरास होतो तथाकथित प्रेक्षकांचा.. तर असा भ्रमनिरास झाल्यानंतर निर्माता सोडून ज्या मंडळींची चिडचिड झाली अशांचा सामना सध्या ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला करावा लागतो आहे. पण, प्रत्यक्षात निर्मात्यांनाच सोनाक्षीने बिकीनीऐवजी साडीवर समाधान माना, असे पटवलेले आहे.
‘आर. राजकुमार’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा नायिकेच्या भूमिकेत आहे. शाहीद कपूरची नायिका म्हणून सोनाक्षीला या चित्रपटात फारच राऊडी व्यक्तिरेखा साकारायची होती. त्यामुळे, या भूमिकेला अनुसरून आणि चित्रपटातील प्रसंगानुरूप वर वर्णन केलेले स्वीमिंग पूलचे दृश्य चित्रित झाले आहे. पण, तिची व्यक्तिरेखाच जर एवढी बोल्ड आहे तर तिने या प्रसंगात साडी परिधान करण्याऐवजी बिकीनी घालायला हवी होती, असा सूर अनेकांनी आळवला. अगदी तिच्याबरोबरच्या आणि तिच्या मागोमाग येणाऱ्या सगळ्याच अभिनेत्री दर चित्रपटागणिक बिकीनी सीन देत सुटल्या असताना एक टय़ा सोनाक्षीनेच का कांगावा करावा?, असा प्रश्न विचारला जातो आहे. सोनाक्षीने मात्र आपल्या भूमिकेत यापुढेही काही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिला बिकीनी घालणे अडचणीचे वाटते का?, या प्रश्नावरही स्पष्ट उत्तर न देता ‘मी चित्रपटात एकदम राऊडी भूमिका केली आहे. प्रभुदेवाचा चित्रपट असल्याने नृत्य आणि मस्ती असा धम्माल पट आहे त्यामुळे आधी कधीही केला नव्हता असा बोल्ड चित्रपट मी केला आहे’, अशी गुगली तिने टाकली आहे. पण, बिकीनीच्या बाबतीत मात्र आपला ठाम नकार असेल, हेही तिने स्पष्ट केले. बिकीनीच्या ऐवजी मी साडीतच दृश्य देणार. तुम्हाला जर माझ्याबरोबर काम करायचे आहे तर ‘जे आहे त्यात चालवून घ्या’ असे निर्मात्यांना आणि ‘पडद्यावर जे दिसते आहे त्यात समाधान माना’ असा प्रेक्षकांना सल्ला देऊन ती मोकळी झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा