राज्यातील तिस-या टप्प्यातील मतदानासाठी मुंबईतील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी आपला हक्क बजावला, तर दुसरीकडे बॉलीवूडमधील  कलाकारांचा एक मोठा वर्ग मतदानाला गैरहजर असल्याचे दिसून आले. बुधवारी (२३एप्रिल)पासून अमेरिकेमध्ये १५व्या आयफा पुरस्कारांच्या सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अमेरिकेला रवाना झाले आहेत.
मतदानाला दांडी मारणाऱ्या बॉलीवूड कलाकारांच्या यादीत सोनाक्षी सिन्हा, सैफअली खान, ह्रतिक रोशन, करीना कपूर, अनिल कपूर यांचा समावेश आहे. आयफा सोहळ्यासाठी अमेरिकेतील ताम्पा बे येथे उपस्थित असणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे लोकसभा निवडणूक लढवित आहेत. सोनम कपूरने आपल्या मतदानाचा हक्क बजावला असला तरी तिचे वडिल अनिल कपूर ‘आयफा’साठी अमेरिकेत गेले आहेत. तसेच सामाजिक प्रश्नांविषयी नेहमी ठाम भूमिका घेणारा आणि यंदाच्या आयफा सोहळ्याचा सूत्रसंचालक फराहान खान याने गुरूवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्याचे आवाहन केले. माधुरी दीक्षित, ह्रतिक रोशन या कलाकारांनी मात्र मतदानाच्या तुलनेत आयफा सोहळ्याला झुकते माप दिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांनी आपण मतदान केल्यानंतरच आयफा सोहळ्यासाठी रवाना होणार असल्याचे म्हटले होते. विद्या बालन, आमीर खान, नेहा धुपिया यांनीसुद्धा गुरूवारी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यामुळे एकुणच मतदानाच्या मुद्द्यावरून बॉलीवूडमध्ये विरोधाभासाचे चित्र दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा