आपल्या गोड चेहऱ्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सोनाक्षी सिन्हाला आता अभिनय करण्याची संधी मिळणार असे दिसतेय. सलमान  खानच्या ‘दबंग’मधून पदार्पण केल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. सलमानची नायिका अशीच तिची ओळख निर्माण झाली. परंतु, आता जुलैमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘लुटेरा’मध्ये प्रथमच तिला अभिनयाला वाव मिळणार असे दिसते आहे. कारण अमेरिकन लेखक ओ हेन्री यांच्या ‘द लास्ट लीफ’ या लघुकथेवर आधारित १९५३ सालात घडणारी ही प्रेमकथा आहे. ‘उडान’ या आपल्या पहिल्या चित्रपटाद्वारे ठसा उमटविणारे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने ‘लुटेरा’चे दिग्दर्शक आहेत. ‘दबंग’ मालिकेतील दोन चित्रपट, अक्षय कुमारसोबत ‘रावडी राठोड’, ‘जोकर’, ‘सन ऑफ सरदार’ अशा गल्लापेटीवर सुपरडूपर हिट झालेल्या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा दिसली. परंतु, या सर्व चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या नायिकांना दुय्यम महत्त्व होते. कारण हे सगळे गाजलेले चित्रपट सुपरस्टारभोवतीच फिरणारे होते. तिला अभिनय करण्यासाठी फारसा वाव नव्हता. आता मात्र प्रेमकथापटातील प्रमुख व्यक्तिरेखा तिला मिळाल्याने तिच्या अभिनयाचा कस लागणार आहे. चित्रपटांनी १०० कोटींच्या वर गल्ला गोळा केल्यामुळे सोनाक्षी आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली गेली इतकेच. मात्र आता प्रेमकथा आणि तीसुद्धा पन्नासच्या दशकात घडणारी प्रेमकथा रूपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. रणवीर सिंग आणि सोनाक्षी ही वेगळी जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘लुटेरा’मध्ये पाखी आणि वरूण या प्रमुख व्यक्तिरेखा ही जोडी साकारणार आहे. माधुरी-जुही-काजोल-करिष्मापासून ते ऐश्वर्या, बिपाशा, दीपिकापर्यंत अनेक अभिनेत्रींनी स्त्रीप्रधान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी प्रेमकथापटांमधूनही आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले आहे. आता ‘लुटेरा’द्वारे सोनाक्षी सिन्हाला आपले अभिनय कौशल्य आणि अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळणार आहे.

Story img Loader