बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी फसवणूकीच्या प्रकरणात अडकलेल्या सोनाक्षीच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहे. तिच्या विरोधात आता मुरादाबाद न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीच्या विरोधात जामिनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यावेळी या सर्व अफवा असल्याचं म्हणत सोनाक्षीनं वादी असलेल्या इव्हेंट मॅनेजरबद्दल अपशब्दांचा वापर केला होता. त्यावरूनच आता तिच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
मूळचा शिवपूरीचा राहणारा प्रमोद शर्मा एक इव्हेंट मॅनेजर आहे. त्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, ‘मी कार्यक्रमांचं आयोजन करतो. ज्यात मी बॉलिवूड सेलिब्रेटींना बोलवतो. याच प्रकारे सोनाक्षी सिन्हालाही एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं. हा कार्यक्रम दिल्ली येथे ३० डिसेंबर २०१८ रोजी होणार होता. मात्र अगदी शेवटच्या क्षणी सोनाक्षी आणि तिच्या सहकलाकारानं या कार्यक्रमासाठी नकार दिला. मात्र त्यांनी प्रमोद शर्मा यांच्याकडून या कार्यक्रमासाठी पूर्ण मानधान घेतलं होतं.’
आणखी वाचा- मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेनं अजूनही पाहिला नाही ‘द कश्मीर फाइल्स’, म्हणाली…
या प्रकरणी सोनाक्षी सिन्हा आणि तिचा सहकलाकार अभिषेक सिन्हा यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच जामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्यानंतर सोनाक्षीनं मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेत या सर्व अफवा असल्याचं म्हणत इव्हेंट मॅनेजरबाबत बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. यावरून आता तिच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. यावर येत्या ४ एप्रिलला सुनावणी होणार आहे.