बॉक्सिंगसारखा खेळ खेळताना सोनाक्षी सिन्हाला पाहायला आवडेल का? आगामी ‘हॉलिडे’ या चित्रपटात सोनाक्षी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शहरी तरुणीच्या भूमिकेत असून त्यात ती कॉलेजची बॉक्सिंग चॅम्पियन आहे म्हणे. ‘थुपक्की’ या सुपरहिट तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून मूळ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास हेच हिंदी रिमेकचे दिग्दर्शक आहेत.
एकदा रिमेक म्हटला आणि तोही सुपरडूपर हिट ठरलेल्या तामिळ चित्रपटाचा असेल तर मूळ कथानकातील व्यक्तिरेखा बदलणे अवघड ठरते. कारण याचा विपरीत परिणाम गल्लापेटीवर झाला तर अशी सतत भीती हिंदी चित्रपट करताना निर्मात्याला वाटत असते. त्यामुळे मुळाबरहुकूम हिंदी रिमेक बनविण्यापेक्षा निर्मात्यांनी थेट मूळ लेखक-दिग्दर्शकालाच हिंदी रिमेक बनविण्यासाठी पाचारण करण्यात आले असावे. पूर्णपणे मसालापट असलेल्या या चित्रपटाबाबत सोनाक्षी, अक्षय कुमार आणि दिग्दर्शक स्वत: मात्र दहशतवादाशी लढा देण्याबाबत सर्वसामान्यांना एक प्रकारचा संदेश दिला आहे असे सांगत फिरत आहेत.
सोनाक्षी सिन्हाला ‘लुटेरा’ या चित्रपटाव्यतिरिक्त अभिनयाला फारसा वाव असलेले चित्रपट मिळालेले नाहीत. पण यात बॉक्सिंग खेळत आणि प्रथमच चित्रपटातून शहरी आधुनिक तरूणी साकारणार आहे.
आता अक्षय कुमारच्या सिनेमात सलमान खानच्या सिनेमासारखेच सारे लक्ष त्याच्यावरच केंद्रित असणार. मग सोनाक्षी सिन्हाच्या भूमिकेला महत्त्व ते किती असणार? पण हे कळले असते तर सोनाक्षीने हा चित्रपट स्वीकारला असता का? पण आपण हा प्रत्येक चित्रपट नीट विचार करून निवडला आहे, असे सांगण्याची बॉलिवूडच्या अभिनेत्रींची फॅशनच आहे.
त्यामुळेच ‘लुटेरा’सारख्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा मला साकारायला खूप आवडते आणि मुख्य प्रवाहातील व्यावसायिक तद्दन गल्लाभरू सिनेमांतूनही व्यक्तिरेखा साकारणे यात समतोल साधण्याच प्रयत्न मी करणार आहे, असे सांगून सोनाक्षी सिन्हा मोकळी झाली.

Story img Loader