बॉलिवूड अभिनेत्री आणि बर्थडे-गर्ल सोनाक्षी सिन्हाने आज (सोमवार) आपल्या वाढदिनी एक टॅटू गोंदवून घेतला आहे. सोनाक्षी सिन्हा आपला २७वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना आश्चर्यचकित करणार असल्याचे सोनाक्षीने याआधीच म्हटले होते. तिने इन्स्टाग्रामवर टॅटू दाखविणारे आपले छायाचित्र पोस्ट केले आहे. सोनाक्षीने एक छोटासा तारा आपल्या गळ्याच्या खालच्या बाजूला गोंदवून घेतला आहे. हा आपल्यासाठी मार्गदर्शक तारा असल्याचे सोनाक्षीचे म्हणणे आहे.

इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या छायाचित्राबरोबर दिलेल्या संदेशात सोनाक्षी म्हणते, आश्चर्यचकीत झालात! हा टॅटू म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वत:ला दिलेली भेट आहे… माझा मार्गदर्शक तारा, आता नेहमी माझ्याजवळ असेल 🙂 दरम्यान, सोनाक्षीने मुंबईतील एका आलिशान क्लबमध्ये वाढदिवसाच्या धमाल-मस्तीला सुरुवात केली. सोनाक्षी सिन्हाने वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावलेल्या चित्रपटक्षेत्रातील मित्रांमध्ये अर्जुन कपूर, विक्रमादित्य मोटवानी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि बॉलिवूडमधल्या अन्य सेलेब्रिटींचा समावेश आहे. सोनाक्षी सिन्हा अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ आणि बोनी कपूरच्या ‘तेवर’ चित्रपटात अर्जुन कपूरबरोबर दिसणार आहे.

Story img Loader