आयकर अपील न्यायाधिकरणाच्या मुंबई शाखेने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आयटी प्रकरणात दिलासा दिला आहे. न्यायाधिकरणाने अभिनेत्रीच्या बाजूने निकाल देत तिचा २९ लाख रुपयांचा विदेशी कर क्रेडिट दावा मंजूर केला आहे. एका आयकर अधिकाऱ्याने सोनाक्षी सिन्हाचा टॅक्स क्रेडिट क्लेम फॉर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने ही बाब उघडकीस आली होती. दरम्यान आता न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर सोनाक्षी सिन्हाला २९ लाख रुपये मिळणार आहेत.
ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, २०१७-१८ साली सोनाक्षीचे कर विवरणपत्र तिच्या दाव्याची पात्रता तपासण्यासाठी निवडले गेले होते. यादरम्यान, आयकर अधिकाऱ्याने दावा केला होता की अभिनेत्रीने २२ सप्टेंबर २०१८ रोजी तिचे रिटर्न भरले होते, परंतु टॅक्स क्रेडिट क्लेमसाठी २० जानेवारी २०२० रोजी फॉर्म ६७ दाखल केला होता. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने कर भरण्याच्या तारखेनंतर फॉर्म भरला, जे नियमांच्या विरोधात आहे. त्या उशीरामुळे तिला टॅक्स क्रेडिट क्लेम मिळू शकला नाही. त्यानंतर हे प्रकरण ITAT कडे पोहोचले होते.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने गेल्या महिन्यात टॅक्स क्रेडिट नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमानुसार, कोणताही करदाता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किंवा त्यापूर्वी क्रेडिट क्लेमसाठी फॉर्म दाखल करू शकतो. हा नियम २०२२-२३ आणि त्यानंतरच्या फॉरेन टॅक्स क्रेडिटच्या दाव्यांना लागू होईल. सोनाक्षीला तब्बल चार वर्षांनी २९ लाख रुपये रक्कम मिळणार आहे.