Sonakshi Sinha-Zaheer Iqbal perform Ganesh aarti: बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून रोजी झहीर इक्बालशी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर आता दोघांनीही गणेश चतुर्थी साजरी केली असून एकत्रपणे गणेश आरती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. झहीर इक्बालनेही धर्माची चौकट ओलांडून आरतीमध्ये सहभाग घेतला. सोनाक्षीने लग्नावेळी सांगितले होते की, माझ्या धार्मिक आचरणाबाबत इक्बालला कोणतीही अडचण नाही. त्याप्रमाणे आता गणेश आरतीचा व्हिडीओ शेअर करून दोघांनीही एकमेकांच्या धर्माचा आदर केल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही काही युजर्सनी इन्स्टाग्रामवर दोघांना ट्रोल केले आहे. यावेळी इक्बालला थोडं अधिक ट्रोल केल्याचं कमेंट्सवरून दिसत आहे.
सोनाक्षी आणि इक्बालने लग्नावेळी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र त्यावर नको ते ट्रोलिंग होऊ लागल्यामुळे तिने काही पोस्टच्या कमेंट पर्यायाला बंद केलं होतं. मात्र रविवारी तिने घरातील गणेशोत्सवाच्या फोटो आणि व्हिडीओची एक पोस्ट टाकली. त्यावरील कमेंट्सचा पर्याय खुला ठेवला. ट्रोलर्सनी ही संधी गाठून आपापल्या मनातली मळमळ तिथे व्यक्त केली. या पोस्टला आतापर्यंत अडीच लाख लोकांनी लाईक केले असून एक हजाराहून अधिक कमेंट आलेल्या आहेत.
अर्पिता खान शर्माच्या घरी गणपतीच्या आरतीमध्ये सोनाक्षी आणि इक्बाल सहभागी झाले होते. सोशल मीडियावर दोघांनीही संयुक्तपणे पोस्ट टाकली असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा जोडीदार एकमेकांच्या श्रद्धांना मान्यता देऊन त्याचा स्वीकार करतात, तेव्हा प्रेम आणि आदर आणखी वाढतो. लग्नानंतरचा आमचा पहिलाच गणेशोत्सव आहे.”
या पोस्टखाली जसे ट्रोलर्स आले, तसे अनेक समर्थक आणि खुल्या मनाने कमेंट करणारेही लोक आले आहेत. अनेकांनी ‘गणपती बाप्पा मोरया..’ असे म्हणत पाठिंबा दिला. तर एका युजरने म्हटले, “एकमेकांचा धर्म स्वीकारणे, त्याच्या विधीत सहभागी होणे आणि जगाकडे दुर्लक्ष करणे, हे मला खूप आवडले.”

तर अनेक ट्रोलर्सनी यावेळी झहीर इक्बालला लक्ष्य केले. मुस्लीम असूनही इतर धर्माच्या विधीत तू कसा काय सहभागी होऊ शकतो? असा प्रश्न विचारला गेला आहे. तर लव्ह जिहादच्या नावाने शंख करणारे लोक आता कुठे लपून बसले? असा प्रश्न काहींनी विचारला आहे. तर काही युजर्सनी सोनाक्षीला लक्ष्य करताना आता रमजानमध्ये रोजा धरणार का? असा प्रश्न विचारला आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सात वर्ष झहीरला डेट केल्यानंतर आता २३ जून २०२४ रोजी त्याच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षीने हे लग्न करताना सप्तपदी घेतली नाही किंवा निकाह केला नाही. दोघांनी विशेष विवाह कायदा, १९५४ नुसार लग्न केलं. या कायद्यानुसार दोन भिन्न धर्मांतील व्यक्ती त्यांचा धर्म बदलल्याशिवाय नोंदणीकृत विवाह करू शकतात. हा कायदा संपूर्ण देशभरात लागू आहे.

लग्नानंतर ईटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षीने आपल्या लग्नाबाबत बोलताना धार्मिक मुद्यावर उपस्थित प्रश्नाचे मनमोकळे उत्तर दिले होते. ती म्हणाली, “आम्ही दोघेही एकमेकांपासून फार वेगळे नाही आहोत. आमची मूळ मुल्ये एकसमान आहेत. आमच्या दोघांच्याही पालकांनी आम्हाला चांगला माणूस आणि आपापल्या दैवावर विश्वास ठेवण्यास शिकवले आहे. मग या दैवताचे नाव काहीही असेल. आयुष्यात एक चांगली व्यक्ती बनून जगणे, हे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या घरातून मिळालेले संस्कार अधिक महत्त्वाचे ठरतात.”