वादांपासून दूर राहण्यासाठी ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा साकारत असलेल्या व्यक्तीरेखेच्या नावात बदल केला.
मिलन लुथ्रा दिग्दर्शित या चित्रपटात सोनाक्षी प्रथम यासमीन नावाची भूमिका करत होती, जी शोएबची प्रियसी आहे. चित्रपटात शोएबची भूमिका अक्षय कुमार करत आहे. परंतु, जेव्हा ‘यासमीन जोसेफ’ हे मंदाकिनीचे खरे नाव असल्याची माहिती निर्मात्यांना मिळाली, तेव्हा त्यांनी सोनाक्षीचे या चित्रपटातील यासमीन हे नाव बदलून जासमीन करण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांना या विषयी कल्पना नसल्याचे आणि हा आश्चर्यकारक योगायोग असल्याचे म्हटले आहे. नाव बदलल्याने चित्रपटाच्या काही भागाचे डबिंग पुन्हा करावे लागणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करीत असून, अक्षय कुमार, इमरान खान, सोनाक्षी सिन्हा आणि सोनाली बेंद्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Story img Loader