मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये विवाहबद्ध होणार आहे. होणाऱ्या पतीसोबतचे खास फोटो पोस्ट करत सोनालीने दिवाळीनिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. २०१८ मधील हे फोटो आहेत. अभिनेता सुबोध भावेच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी सोनाली तिचा होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत पुण्याला आली होती.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनालीनं लिहिलंय, ‘पुढच्या वर्षी मिसेस होऊन तुमच्यासमोर येणार’. २ फेब्रुवारी २०१९ रोजी सोनाली आणि कुणालचा दुबईत साखरपुडा पार पडला. त्यानंतर १८ मे रोजी वाढदिवशी सोनालीने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना सांगितली. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. सोनालीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही. लग्नानंतर ती दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सोनालीने काही अधिकृत माहिती दिली नाही.
View this post on Instagram
कोण आहे सोनालीचा होणारा पती?
कुणाल बेनोडेकर असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे. ‘केनो’ या नावानेही त्याची ओळख आहे. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.