मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. अखेर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीचा हा विवाहसोहळा ३ भागांच्या मालिकेच्या स्वरुपात प्रसारित करण्यात आला. सोनाली आणि कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली.
सोनालीच्या लग्न सोहळ्याच्या व्हिडीओंची मालिका नुकतीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. यातील एका व्हिडीओमध्ये सोनाली कुलकर्णीने तिच्या प्रपोजचा मजेदार किस्सा सांगितला. सोनाली म्हणाली, “माझी आणि कुणालची भेट २०१७ मध्ये काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली. आम्ही ऑनलाइन पहिल्यांदा भेटलो होतो. चॅटवर बोलणं झालं होतं. एकमेकांबद्दल जाणून घ्यायला सुरुवात झाली, मग मैत्री झाली. पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो. मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. मग तो दुबईमध्ये शिफ्ट झाला. आमच्या भेटी वाढल्या.”
आणखी वाचा- “कुणालचा जन्म लंडनचा…” सोनाली कुलकर्णीने नवऱ्यासाठी घेतला हटके उखाणा
सोनाली पुढे सांगते, “२ वर्षांनंतर मी त्याला अक्षरशः धमकी दिली होती. या भेटीनंतर जर का तू पुढे काही ऑफिशियल केलं नाही तर माझे आई-वडील मला काही तुला भेटायला पाठवणार नाहीत. आमच्या भेटीची शेवटची संध्याकाळ होती तेव्हा तो मला दुबईच्या सगळ्यात उंचीवरच्या ठिकाणी घेऊन गेला आणि आम्ही एक झीप लाइन रोलर कोस्टर राइड केली. सूर्यास्ताची वेळ होती आणि अशा सुंदर संध्याकाळी तो मला प्रोपज करणार असं मला वाटत होतं. मी त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. पण त्यावेळी तसं काहीच घडलं नाही.”
आणखी वाचा- दुबईत साखरपुडा का केला? खुद्द सोनाली कुलकर्णीनेच सांगितले कारण..
कुणालच्या प्रपोजबद्दल सांगताना सोनाली म्हणाली, “दुसऱ्या दिवशी माझी फ्लाइट होती. सकाळी मी त्याच्याकडे रुक्ष नजरेनं पाहिलं आणि त्याला मला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. मी लिफ्टपाशी उभी होते. अचानक कुणालने मला आतून हाक मारली आणि तू काही विसरत तर नाहीयेस ना? असं म्हणत ओव्हरअॅक्टिंग करून त्याने मला पुन्हा आता बोलावलं आणि माझ्या आवडीचं गाणं लावलं. त्याने मला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. यावर माझं म्हणणं असं होतं की तू हे काल का नाही केलं. त्यावर तो मला म्हणला की मी कालच तुला प्रपोज करणार होतो पण मी त्यावेळी अंगठी विसरलो होतो.” अशा प्रकारे कुणालचा सूर्यास्ताच्या वेळी सोनालीला रोमँटिक प्रपोज करण्याचा प्लान फसला होता.
दरम्यान अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीने पूर्ण केली आहे. आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.