महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे गणपती बाप्पा घरोघरी व सार्वजनिक मंडळांत विराजमान झाले आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर बाप्पाचे सुंदर फोटो अपलोड केले आहेत. मात्र या सर्व पोस्टमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेची पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा गणेशोत्सव सोनालीसाठी खास आहे कारण गेल्या वर्षी ती घरापासून दूर परदेशात कॅन्सरवर उपचार घेत होती. कॅन्सरला मोठ्या धैर्याने सामोरं जात आता पूर्ण बरी होऊन ती भारतात परतली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सोनालीने बाप्पासोबतचा फोटो पोस्ट करत तिने आभार मानले होते. त्यानंतर आता तिने स्वत: बाप्पासाठी उकडीचे मोदक केले आहेत.

‘गणपती बाप्पा मोरया, चला उकडीचे मोदक खाऊया,’ असं कॅप्शन देत सोनालीने मोदकांचा फोटो अपलोड केला आहे. गणेशोत्सवातील सर्वोत्तम भाग म्हणजे उकडीचे मोदक बनवणे असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

कॅन्सरमुक्त होऊन घरी परतल्याचा आनंद सोनालीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. ”गणेशोत्सव हा माझा आवडचा उत्सव आहे आणि मागील वर्षी तो साजरा करणं मी खूप मिस केलं. यावर्षी निरोगी आणि खंबीरपणे परतताना कुटुंबासमवेत हा उत्सव साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. तुमच्यातील श्रद्धेला कमी होऊ देऊ नका. कारण ही श्रद्धाच तुमच्यात आणि देवात संवाद घडवून आणू शकते,” असं म्हणत तिने बाप्पाचे आभार मानले आहेत. यावर्षीदेखील इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना केल्याचंही तिने नमूद केलं आणि चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

सोनालीला २०१८ मध्ये कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर ती बरीच महिने परदेशात उपचारासाठी होती. वेळोवेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची संवाद साधला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bendre made modak for ganapati bappa shares photo on twitter ssv