नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. २०१८ या वर्षाच्या चांगल्या आठवणी मनात साठवून आणि वाईट गोष्टींना मागे सोडून एक नवीन सुरुवात करण्याचा मानस अनेकजण करत आहेत. अशातच कॅन्सरशी झुंज देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

केस कापण्यापूर्वीचा फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं, ‘केस कापण्यापूर्वीचा माझा हा फोटो. आता माझे केस हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये मी पुन्हा अशी दिसू शकते. इथपर्यंतच्या प्रवासाने मला खूप शिकवलंय. कॅन्सरशी लढा देण्याच्या शरीराच्या इच्छाशक्तीपासून ते या काळात माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक गोष्टीने मला आयुष्याच्या अस्थिरतेची शिकवण दिली आहे. गोष्टी येतात आणि जातात हे शिकवलंय (माझ्या केसांप्रमाणेच). नवीन वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी जाईल अशी आशा करते.’

वाचा : ‘या’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एण्ट्री

कर्करोगावरील उपचारासाठी गेल्या काही महिन्यांपासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये आहे. सोनालीची तब्येत आता ठीक असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. न चुकता नियमितपणे सोनालीचं चेकअप सुरु असतं, असं सोनालीच्या पतीने गोल्डी बहलने सांगितलं होतं.

Story img Loader