हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अटीशर्तीवर काम करण्याची सवय असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेने चित्रपटांमधून विश्रांती घेतली आणि छोटय़ा पडद्यावर काम सुरू केले होते. रिअॅलिटी शोची परीक्षक ते एका काल्पनिक मालिकेची नायिका असा प्रवास केलेल्या सोनालीला या टेलीविश्वाच्या अजब कारभाराचा गजब फटका बसला आहे. आपल्याचबरोबर ही अजब दास्ताँ का घडली?, याचे उत्तर शोधत असलेल्या सोनालीने आता मराठी चित्रपट करायचा निर्णय घेतला आहे.
रिअॅलिटी शोची परीक्षक, सूत्रसंचालक म्हणून जम बसल्यानंतर सोनालीने मालिकेत मोठी भूमिका करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वेळी रुपेरी पडद्यावरचे मोठमोठे कलाकार मालिकांमध्ये रमले होते हे पाहून सोनालीनेही आलेल्या भूमिकेचा स्वीकार के ला. ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘अजीब दास्ताँ है यह’ या मालिकेत सोनाली बेंद्रे मुख्य भूमिका साकोरत होती. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली. सोनालीला छोटय़ा पडद्यावरही प्रेक्षकांनी पसंत के ले होते. आणि तरीही आता ती या मालिकेचा भाग असणार नाही, असे तिच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोनाली या मालिके तून बाहेर पडल्यानंतर अनेक तर्कवितर्काना सुरुवात झाली. या मालिकेसाठी वाहिनीने सोनालीबरोबर जो करार केला होता तो वाढवण्यात आलेला नसल्यानेच ती या मालिकेतून बाहेर पडली आहे, असे तिच्यावतीने सांगण्यात आले. आता वाहिनीने तिच्याबरोबरचा करार का वाढवला नाही, यामागची अजीब दास्ताँ अजून तिला स्वत:लाच उलगडलेली नाही. त्यामुळे झाल्या गोष्टींवर विचार करत बसण्यापेक्षा पुढचे नियोजन करण्याचा निर्णय सोनालीने घेतला आहे. सोनाली मालिकांमध्ये रमलेली असताना तिच्याकडे काही चांगल्या मराठी चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. मात्र, मालिकेशी कराराने बांधलेली असल्याने चित्रपट करण्यासाठी तिच्याकडे वेळ नव्हता. ‘अजीब दास्ताँ है यह’ सोडल्यानंतर तिने पुन्हा त्या चित्रपटांवर विचार विनिमय सुरू केला. आता तिच्याकडे दोन मोठय़ा मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. त्यापैकी एका चित्रपटाला तिने संमती दिली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट असणार आहे. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या भूमिका नायिकाप्रधान असल्याने तिने या भूमिकांना होकार दिल्याचे समजते. मालिका सोडून तिने पुढची वाटचाल सुरू केली असली तरी कोणतेही कारण न देता मालिका सोडावी लागल्याचा सल तिच्या मनातून गेलेला नाही, असे दिसते. नुकत्याच झालेल्या ‘लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्या’त पुरस्कार देण्याच्या निमित्ताने व्यासपीठावर आलेल्या सोनालीने आपल्या मालिकेविषयी आणि वाहिनीविषयी चार चांगले शब्द बोलत निरोप घेतला. तिच्यापुरती मालिकेचा विषय संपला असल्याने कारकीर्दीच्या या टप्प्यावर नवे काही करण्याची संधी मराठी चित्रपटांच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास सोनालीला वाटतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा