Sonali Kulkarni : मुंबईत दहीहंडीचा प्रचंड उत्साह बघायला मिळतो आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मानाच्या दहीहंडींचं आयोजन केलं जातं. दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील मोठमोठ्या बक्षीसांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमांना चित्रपटसृष्टीतील कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत. मुंबईतील मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडूनही दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती होती. या दरम्यान सोनाली कुलकर्णीने ( Sonali Kulkarni ) माध्यमांना प्रतिक्रिया देताना मराठी माणसाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मराठी माणसाने संस्कृती जपली पाहिजे असंही सोनाली ( Sonali Kulkarni ) म्हणाली.
मुंबईतली दहीहंडी कायमच माझ्या स्मरणात राहणार आहे
“मुंबईतली मराठमोळी दहीहंडी माझ्यासाठी आठवण राहणार यापुढे. लहानपणीच्या फार आठवणी नाहीत. पण लोक ओळखायला लागले तेव्हापासून मी दहीहंडी उत्सवांना जाते. हा उत्सव कसा साजरा होतो ते पाहण्यास मिळतं. चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळते. आपली संस्कृती टिकवायची असेल तर उत्सव अशाच पद्धतीने साजरे करायला हवेत. मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचेल.” असंही सोनालीने ( Sonali Kulkarni ) म्हटलं आहे.
मुंबईबाबत काय म्हणाली सोनाली?
“दही हंडी उत्सवात मराठी माणसांना एकत्र पाहून खूप आनंद होतो. मराठी चित्रपटांमधले कलाकार या ठिकाणी येत आहेत. आपल्या मुंबईत गोविंदाच्या निमित्ताने हक्काचं व्यासपीठ मराठी माणसांना मिळतं. आपल्याला कायम वाटतं मुंबईतून मराठी माणसं संपत चालली का? पण अशा वेळी म्हणजे गोपाळदादांसारखी माणसं मराठी माणसांना एकत्र आणतात तेव्हा कळतं. दही हंडी हा आपल्या महाराष्ट्रातला मानाचा उत्सव आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात त्याच्या आठवणी आहेत. मराठमोळ्या पद्धतीने साजरा होतो आहे, लालबागमध्ये तो अट्टाहास पाहण्यास मिळतो आहे ते पाहून गहिवरुन आलं आहे.” असं सोनालीने ( Sonali Kulkarni ) म्हटलं आहे.
महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांबाबत काय म्हणाली सोनाली?
“महिलांवरच्या अत्याचाराबाबत फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात ही परिस्थिती आहे. देशभरातले कायदे कठोर होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही राज्यात क्रांती घडणार नाही. प्रत्येक राज्यात बदल घडायला हवा असेल, देशात बदल घडवायचा असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया त्वरित व्हायला हवी. लोकांना कळत नाही की याची शिक्षा कठोर असू शकते तोपर्यंत गांभीर्य जाणवणार नाही. बदल वरुन घडत नाही तोपर्यंत परिणाम पाहण्यास मिळणार नाही.” असं सोनालीने म्हटलं आहे.