चित्रपट, नाटक, कवितांचा कार्यक्रम या सगळ्या आघाडय़ांवर व्यग्र असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर मालिकेत भूमिका करते आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘तमन्ना’ मालिकेत वकील समुपदेशकाच्या भूमिकेत सोनाली दिसते आहे. आत्तापर्यंत तिने रिअ‍ॅलिटी शोजमधून काम केले आहे, मात्र हिंदी मालिकेत काम करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे.
छोटय़ा पडद्यावर काम करण्याची वेळ माझ्यावर आली नव्ही. याआधी मी ‘कलर्स’वर ‘फीअर फॅक्टर’मध्ये भाग घेतला होता आणि ‘झलक दिखला जा’मध्येही मी होते. पण, त्यापलीकडे मालिकांमधून काम करण्याचा विचार कधीच नव्हता, असे सोनालीने ‘वृत्तांत’शी बोलताना स्पष्ट केले. ‘तमन्ना’ ही मालिका रमेश देव प्रॉडक्शनची आहे. आणि देव कुटुंबीयांशी म्हणजे रमेश-सीमा देव यांच्याबरोबरच अजिंक्य-अभिनय देव यांच्याबरोबर माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अजिंक्य देव यांच्याबरोबर मी कामही केलेले आहे. त्यांनी जेव्हा मला या मालिके ची आणि नंदिता या व्यक्तिरेखेची कल्पना दिली तेव्हाच मी होकार दिला. या मालिकेचा विषय खूप सुंदर आहे, असे सोनालीने सांगितले.
‘तमन्ना’ ही मालिका आजच्या आपल्या पिढीची कथा सांगते. त्यामुळे तरुण पिढी नक्कीच या मालिकेशी स्वत:ला जोडू शकते. माझ्या व्यक्तिरेखेची मांडणीही वेगळी आहे. नंदिता ही वकील आहे, समुपदेशक आहे. एका कणखर स्त्रीच्या भूमिकेत ती समोर येते, सत्याच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी पण माणूस म्हणून वेगळा विचार करणारी अशी नंदिता आहे, अशी माहिती सोनालीने दिली.
अभिनय देव हे दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये आणि आता मालिकांमध्येही एक नावाजलेले नाव आहे. अभिनयची विचारसरणी हे अत्यंत वेगळी आहे. त्यामुळे ही मालिका ज्या पद्धतीने आकार घेते आहे, त्याची मांडणी खूप वेगळी आहे. मुलींच्या स्वत:कडून ज्या अपेक्षा असतात आणि त्यांच्याकडून समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत, याची सांगड घालणे मुलींना कित्येकदा जमत नाही. या मालिकेतून ‘तमन्ना’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या प्रवासातून नेमके याच गोष्टीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सोनालीने सांगितसे.
या मालिकेतील नंदिताची व्यक्तिरेखा फार मोठी नाही, त्यामुळे या कामात अडकून पडण्याची भीती नाही, असे सांगणारी सोनाली सध्या नाटक, चित्रपट, कार्यक्रम अशा सगळ्याच आघाडय़ांवर कार्यरत आहे. सध्या ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ हे नाटक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत करते आहे, त्याची निर्मितीची जबाबदारीही माझी आहे. शिवाय, नसिरुद्दीन शहा आणि मी ‘गर्दीश में तारे’ हे गीता दत्त यांच्या जीवनावर आधारित नाटक करतो आहोत. बाबा आमटेंच्या आयुष्यावर आधारित ‘करुणोपनिषदे’ हा कार्यक्रमही करतो आहोत, असे तिने सांगितले. चित्रपटांच्या बाबतीतही ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’, सतीश कौशिक यांची निर्मिती असलेला ‘स्कूल चलेंगे’, ‘कच्चा लिंबू’ आणि शंतनू रोडेंचा ‘पैठणी’ अशा चित्रपटाातही सोनाली काम करते आहे.

Story img Loader