Famous Tiktok Star and BJP Leader Sonali Phogat Death : प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. यामुळे लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत त्यांनी सुंदर फेटा परिधान केला होता. पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा : Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
बिग बॉसच्या १४ मध्येही सहभागी
सोनाली यांनी छोट्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. त्या फार प्रसिद्ध होत्या. टिकटॉक स्टार म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे. त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या पर्वात सहभाग घेतला होता. तसेच २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
सोनाली फोगट यांची प्रसिद्धी पाहून भारतीय जनता पक्षाने हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपाने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती.
पतीचा संशयास्पद मृत्यू
सोनाली फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. सोनाली यांना एक मुलगी असून यशोधरा असे तिचे नाव आहे. सोनाली यांचे पती संजय फोगट यांचा २०१६ मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या मुंबईत काही कामानिमित्त आल्या होत्या.
आणखी वाचा : ‘वेलकम’, ‘हेराफेरी’चे निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचे निधन
तसेच जून २०२० मध्ये सोनाली फोगट यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी एका कृषी अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारली होती. याप्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारीही दाखल करण्यात आली होती. यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या होत्या.