प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे २३ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं प्रथम स्पष्ट झालं होतं. हे प्रकरण तेव्हा चांगलंच चर्चेत होतं आणि याविषयी बऱ्याच गोष्टी लिहिल्या आणि बोलल्या गेल्या होत्या. याच प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने नुकतंच चार्जशीट दाखल केली आहे आणि यात सुधीर सागवान आणि सुखविंदर सिंग यांची नावं यात प्रमुख आरोपी म्हणून समोर आली आहेत. सोनाली या मृत्यूच्या आधी एक दिवस या दोघांबरोबर गोव्याला काही कामानिमित्त गेल्या होत्या. तेव्हा त्यांना प्यायल्या दिलेल्या पाण्यात अंमली पदार्थाची भेसळ करून त्यांना मारण्यात आल्याचं समोर आलं होतं.
आता यामध्ये सोनाली फोगट यांचा स्वीय सहायक (पर्सनल असिस्टंट)सुद्धा सामील असल्याची गोष्ट समोर आली आहे. इतकंच नाही तर सोनाली यांना अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी याच सहायकाने जबरदस्ती केल्याचंही उघडकीस आलं आहे. गोव्यात अंजुना बीचवरील एका रेस्टोरंटमध्ये फोगट यांना जबरदस्ती ‘मेथ’ नावाचे ड्रग त्यांच्या पाण्यात मिसळण्यात आले ज्यामुळे पुढच्या दिवशी त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांना सेंट अॅंथनी हॉस्पिटला नेपर्यंतच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं पोस्ट्मॉर्टेममध्ये स्पष्ट झालं होतं.
सोनाली यांनी छोट्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले. त्या फार प्रसिद्ध होत्या. टिकटॉक स्टार म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जायचे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे. त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या पर्वात सहभाग घेतला होता. तसेच २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.