प्रख्यात धावपटू मिल्खा सिंह याच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटासाठी अभिनेत्री सोनम कपूर हिने केवळ ११ रुपये घेतले आहेत. एरवी करोडो रुपयांचे मानधन घेतानाच वितरणाच्या हक्कामध्येही वाटा ठेवणाऱ्या कलाकारांच्या अनेक सूरस कथा नेहमी कानावर पडतात. पण सोनम ही त्याला अपवाद ठरली आहे.
मिल्खा सिंह याच्या संपूर्ण जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये मिल्खाच्या भूमिकेत फरहान अख्तर दिसणार आहे. मिल्खा हा लष्करामध्ये भरती होण्यापूर्वी छोटय़ामोठय़ा चोऱ्या करून आपली गुजराण करीत असे. त्या वेळी त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते. व या मुलीमुळे तो चोऱ्या करण्याचे सोडून लष्करामध्ये भरती होतो. या मुलीची व्यक्तिरेखा सोनम कपूर हिने साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या व्यक्तिरेखेबद्दल सोनमला विचारणा केली असता तिने पटकन होकार देताना आपण केवळ ११ रुपयेच मानधन घेणार असल्याचे सांगितले. सोनमची ही अट राकेश मेहरा यांनीही मान्य केली. याबाबत बोलताना सोनम कपूर हिने सांगितले की, आतापर्यंत मी ‘साँवरिया’ तसेच ‘दिल्ली ६’, ‘हेट लव्ह स्टोरी’, ‘मौसम’ आणि अब्बास मस्तान यांच्या ‘प्लेअर्स’ या चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण दुर्दैवाने हे चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे माझ्यातील अभिनयाला फारसा वाव मिळाला नाही. पण ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटामध्ये मी साकारत असेलली व्यक्तिरेखा ही खरोखरच आव्हानात्मक असून ती माझ्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ भूमिकेची लांबी अथवा रुंदी न पाहता त्या व्यतिरेखेमधील सशक्तता पाहणे महत्त्वाचे असते. आणि सशक्तता या व्यक्तिरेखेत ठासून भरलेली असल्याने तेथे मला मिळणारे पैसे हे गौण ठरतात. त्यामुळेच मी केवळ ११ रुपये घेण्याचे ठरविले आणि तसा करारही करून घेतला आहे. फरहान अख्तर यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळाले याचा आवर्जून उल्लेखही सोनमने यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा