बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांच्यासोबत २७ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. फरिदाबाद पोलिसांनी अभिनेत्री सोनम कपूरच्या सासऱ्यांच्या फर्मची २७ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीला अटक केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.
फरिदाबाद पोलिसांनी सांगितले की, हरीश आहुजांच्या फर्मने गेल्या वर्षी जुलैमध्ये या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर ते याचा तपास करत होते. तेव्हापासून दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कर्नाटकसह देशातील विविध शहरांतून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांची फरीदाबाद येथील शाही एक्सपोर्ट फॅक्टरीतून २७ कोटी ६१ लाखांची फसवणूक झाली आहे.
रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्स अँड लेव्हीज परवान्याद्वारे आरोपींनी ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी सांगितले की, २६ जुलै २०२१ रोजी फरीदाबाद पोलिसांना सेक्टर-२८ मध्ये असलेल्या या रॉयल एक्सपोर्ट कंपनीकडून RoSCTL परवान्याद्वारे फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
फरिदाबादचे पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी सांगितले की, हरीश आहुजांच्या नावाने एक बनावट कंपनी तयार करण्यात आली आणि सायबर ठगांनी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले. तक्रार मिळाल्यानंतर फरिदाबादच्या सायबर पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा तपास सुरू केला. याप्रकरणी सेक्टर ३१ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपींमध्ये दिल्लीचे रहिवासी मनोज राणा, मनीष कुमार, प्रवीण कुमार आणि मनीष कुमार मोगा आणि रायचूर (कर्नाटक) येथील रहिवासी गणेश परशुराम आणि महाराष्ट्राचे रहिवासी भूषण किशन ठाकूर (मुंबई), राहुल रघुनाथ (रायगड) आणि संतोष सीताराम (पुणे) यांचा समावेश आहे. याशिवाय चेन्नईतील सुरेश कुमार जैन, दिल्लीतील ललित कुमार जैन यांनाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचे तपास अधिकारी इन्स्पेक्टर बसंत कुमार यांनी सांगितले की, आरोपींच्या ताब्यातून दोन लॅपटॉप, एक कॉम्प्युटर, सहा मोबाईल आणि २० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.