बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा पती आणि प्रसिद्ध बिझनेसमन आनंद आहुजा फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. सोनमचा पती आनंद आहुजावर एका आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीनं फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आनंद आहुजानं टॅक्स आणि कस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कथित स्वरुपात कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत असं या कंपनीचं म्हणणं आहे. जानेवारी महिन्यात आनंदनं या कंपनीच्या कोणत्या एका शिपमेंटला उशीर झाल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्याचं हे ट्वीट त्यावेळी व्हायरल झालं होतं.
आनंद आहुजानं एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यानं लिहिलं होतं, ‘कोणी आंतरराष्ट्रीय कंपनी माययूएसच्या संपर्कात आहे का? कारण त्यांच्या शिपमेंटमध्ये उशीर होत आहे. मला यामुळे भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही कंपनी चुकीच्या पद्धतीनं सामान जप्त करत आहे आणि औपचारिक कागदपत्रांच्या कारवाईला नकार देत आहे.’
आनंद आहुजाच्या या ट्वीटनंतर संबंधित कंपनीनं त्याला सोशल मीडियावर काही मर्यादा असल्यामुळे चॅट किंवा इमेलद्वारे संपर्क करण्याचा सल्ला दिला होता. यावर आनंदनं या सर्व गोष्टी मागच्या ७ दिवसांत करून झाल्या असल्याचं म्हटलं होतं. यासोबतच त्यानं ही कंपनी घोटाळा करत असल्याचंही म्हटलं होतं.
यानंतर संबंधित कंपनीनं फेब्रुवारीच्या सुरुवातीला आनंद आहुजाच्या ट्वीटला उत्तर देताना, त्यांच्या सेवांमध्ये समस्या नाही तर आनंद आहुजानं दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं म्हणत, आनंदनं सामानासोबत टॅक्स म्हणून दिलेली रक्कम ही ९० टक्के कमी असल्याचं स्पष्ट केलं होतं. आनंद आहुजानं टॅक्स आणि कस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कथित स्वरुपात कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत असं या कंपनीचं म्हणणं आहे.