करण जोहरच्या लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींना हजेरी लावली आहे. मागच्या एपिसोडमध्ये आमिर खान आणि करीना कपूर यांनी शोमध्ये धम्माल केली होती. आता आगामी एपिसोडमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर ही भावा-बहीण जोडी दिसणार आहे. या शोचा नवा प्रोमोही समोर आला आहे, ज्यावरून सोनम कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही हे दिसून येतं.
अभिनेत्री सोनम कपूर यांच्यातील वाद खूप जुना आहे आणि सोनम रणबीरवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. नुकतंच करण जोहरच्या चॅट शोमध्ये सोनम कपूर रणबीर कपूरच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची खिल्ली उडवताना दिसली. सोनम कपूरनं ‘कॉफी विथ करण’मध्ये रणबीर कपूरच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या नावाची खिल्ली उडवली. एवढंच नाही तर त्याच्या चित्रपटाचं नाव ‘ब्रह्मास्त्र’ नाही तर ‘शिवा नंबर १’ असायला हवं होतं, असंही तिनं म्हटलंय.
आणखी वाचा- Video : “…कारण मी अनिल कपूरची मुलगी आहे” म्हणत सोनमने उडवली अर्जुनची खिल्ली
नव्या प्रोमोमध्ये, करण जोहर सोनम कपूरला, ‘तुझ्या मते सध्या चर्चेत असलेला व्यक्ती कोण आहे?’ असा प्रश्न विचारताना दिसतोय. त्यावर उत्तर देताना सोनमने रणबीर कपूरचे नाव घेतलं. सोनम म्हणते, “मला याबाबतीत रणबीर कपूर बेस्ट वाटतो, कारण आजकाल सर्वच त्याला अयान मुखर्जीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना पाहत आहेत.’ यावर करणने चित्रपटाचे नाव विचारले तेव्हा सोनम चित्रपटाचं जे नाव सांगितलं ते ऐकून करण जोहरला हसू आवरेनासं झालं.
सोनम म्हणाली, “शिवा नंबर १, खरं तर त्याच्या चित्रपटाचं नाव ‘ब्रह्मास्त्र’ नाही शिवा नंबर १ असायला हवं होतं.” अर्थात याआधीही सोनमने ‘कॉफी विथ करण’मध्ये रणबीर कपूरची खिल्ली उडवली आहे. त्यावेळी तिने दीपिका पदुकोणसोबत या शोमध्ये हजेरी लावली होती. याच काळात रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले होतं आणि या शोमध्ये सोनम दीपिकाची बाजू घेताना दिसली होती. ‘रणबीर चांगला बॉयफ्रेंड असू शकतो यावर मला शंका आहे’ असं ती म्हणाली होती. सोनमने रणबीरला ‘मम्माज बॉय’ असंही म्हटलं होतं.
आणखी वाचा- सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट
दरम्यान सोनम कपूरच्या बोलण्यावरून रणबीर कपूरसोबतची तिचं भांडण अद्याप मिटलेलं नाही हे या व्हिडीओवरून दिसून येतंय. २०१८ मध्ये ती संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’मध्ये रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. पण शोच्या प्रोमोवरून ती अद्याप त्याच्यासोबतचा वाद विसरलेली नाही हे स्पष्ट होत आहे.