एकीकडे ‘२४’सारख्या हॉलीवूड शोला भारतीय साज चढवून इथल्या छोटय़ा पडद्याला नवे वळण द्यायचा प्रयत्न अभिनेता अनिल कपूर करतो आहे, तर दुसरीकडे आपली चित्रपट कारकीर्द सांभाळतानाच स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी धडपडणाऱ्या सोनम कपूरनेही आपल्याला छोटय़ा पडद्यावर काम करण्यात रस असल्याचे जाहीर केले आहे.
सोनमला याआधीही टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शो करण्याचे प्रस्ताव आले होते, पण तेव्हा चित्रपटांवर लक्ष केंद्रित केलेल्या सोनमने या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मात्र ‘रांझना’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाल्यावर सोनमची बॉलीवूड कारकीर्द रुळावर आली आहे. आता चित्रपट आणि जाहिरातींबरोबरच आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे पर्याय धुंडाळायला सोनमने सुरुवात केली आहे. सोनमची फॅशनबद्दलची आवड जगजाहीर आहे. शिवाय ती लहान मुलांमध्ये, विशेषत: ती किशोरवयीन मुलामुलींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुलांशी संबंधित रिअॅलिटी शोचे प्रस्ताव मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. यातल्या एखाद्या रिअॅलिटी शोची संकल्पना आपल्याला आवडली तर आपण लवकरच छोटय़ा पडद्यावर येण्यास उत्सुक असल्याचे संकेत सोनमने दिले आहेत. सध्या ती ‘खूबसूरत’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये व्यग्र आहे.