पूर्वीच्या तुलनेत मासिक पाळीवर बोलणं आता सामान्य झालं आहे. या काळात स्त्रियांच्या समस्या, समाजात वावरताना येणारे अनुभव याबद्दल अनेकजणी बोलताना दिसतात. बॉलिवूडमध्ये तर ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटातून या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला. पण आजही अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळे सल्ले दिले जातात. सामान्य स्त्रियांपासून ते अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही मासिक पाळीच्या काळात वेगवेगळे सल्ले मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं स्त्रियांच्या मासिक पाळीवर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत आलिया म्हणाली होती, “जेव्हा मासिक पाळीच्या काळात स्रियांना धार्मिक स्थळांवर प्रवेश नाकारला जातो तेव्हा मला वाईट वाटतं. अशी कोणत्याही प्रकारची अट त्यांच्यासाठी असणं चुकीचं आहे. जर मासिक पाळीमुळे नव्या जीवाचा जन्म होतो तर मग महिलांच्या मासिक पाळीला अशुद्ध कसं काय म्हटलं जाऊ शकतं.” आलिया व्यतिरिक्त सोनम कपूरनेही मासिक पाळीच्या काळात आलेले अनुभव शेअर केले होते.
आणखी वाचा- “मला तो माझ्या भावाप्रमाणे वाटला होता पण…”; ‘अशी’ होती सोनम कपूर-आनंद आहुजाची पहिली भेट
एका मुलखतीत सोनम कपूरनं मासिक पाळी संबंधी तिचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली होती, “मी १५ वर्षांची होते जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली. त्यावेळी मला घरातील काही ठिकाणी जाण्याची परवानगी नव्हती. माझी आजी मला सांगायची स्वयंपाक घरात जाऊ नकोस, देवघराच्या आसपास जाऊ नकोस. जिथे लोणचं ठेवलेलं असेल त्याचा आजूबाजूला फिरू नकोस. मी मुंबई सारख्या शहरात लहानाची मोठी झाले तरीही मला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या तर मग विचार करा गावातील मुलींना किती काय काय सहन करावं लागत आहे.”
दरम्यान मासिक पाळीच्या काळातील अनुभवांबाबत बोलणारी सोनम कपूर एकमेव अभिनेत्री नाही. तिच्या व्यतिरिक्त अभिनेत्री राधिका आपटे, करीना कपूर खान आणि श्रद्धा कपूर यांनीही मासिक पाळीबाबतचे आपापले अनुभव शेअर केले आहेत.