कर्नाटकमधील हिजाब वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटलं. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. अशात आता अभिनेत्री सोनम कपूरनंही या वादावर आपलं मत मांडलं आहे.
सोनम कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत कर्नाटक हिजाब वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एका बाजूला हिजाब बांधलेली महिला तर दुसऱ्या पगडी बांधलेला पुरुष दिसत आहे. यातील पगडी असलेल्या फोटोवर हे बांधणं निवड असू शकते असं लिहिलंय. तर हिजाब बांधलेल्या फोटोवर, असा कपडा बांधण्याची तुमची निवड असू शकत नाही असं लिहिलं आहे. यावर स्वतः सोनमनं कोणतीही कमेंट न करताही हिजाब बांधण्यास आपलं समर्थन दिलं आहे. याआधी अभिनेत्री कंगना रणौत, शबाना आझमी, जावेद अख्तर, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.
कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असं न्यायालयाने म्हटलं. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणादेखील केली होती.