बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद आहुजा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ११ आणि १२ मे रोजी स्वित्झर्लंडमध्ये अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु लग्नानंतर सोनम आपल्या नवऱ्याबरोबर कायमची लंडन रहिवासी होणार असल्याच्या चर्चा सध्या सिनेवर्तुळात होताना दिसतात. आता खरं काय नी खोटं काय हे फक्त सोनमच सांगू शकते. पण तिने जर बॉलिवूड कायमचे सोडले तर मात्र तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का असेल यात काही शंका नाही.
लग्नानंतर स्त्रियांच्या आयुष्यात बऱ्याच जबाबदाऱ्या येतात. त्यांच्या मुक्त जीवनात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात. आणि आपल्या कर्तव्यांच्या पुर्ततेसाठी अनेकदा स्त्रियांना आपल्या उत्तमरित्या सुरु असलेल्या करिअरला खिळ बसवावी लागते. सामान्य स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या या परिस्थितीला कलाकार स्त्रियांचाही अपवाद नाही. आजवर नितू सिंग, नम्रता शिरोडकर, सायरा बानो, सोनाली बेंद्रे यांसारख्या अनेक गुणवान अभिनेत्रींनी लग्नानंतर आपल्या अभिनय कारकिर्दीला ब्रेक लावल्याचा इतिहास आहे. जेव्हा त्यांनी सिनेक्षेत्राला राम राम ठोकला तेव्हा चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते.
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूरदेखील याच अभिनेत्रींच्या पावलांवर पाऊल ठेवणार का हे तर येणारा काळच ठरवेल. सध्या सोनम कपूरचे ‘वीरे दी वेडींग’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, आणि संजय दत्तच्या बायोपिक हे तीन महत्त्वपूर्ण चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. या तीन चित्रपटांनंतर तिने कोणतेही चित्रपट अद्याप स्वीकारले नाहीत त्यामुळे ती खरंच बॉलिवूडला राम राम ठोकणार का असाच प्रश्न आता अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.