‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अभिनेत्री सोनम कपूरला स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्यानंतर काही दिवस उपचार घेऊन खडखडीत बरी झालेली सोनम कपूर आता धडाक्यात कामाला लागली असून तिच्या नव्या चित्रपटातील व्यक्तिरेखेचा कॉमिक लुक असलेले पोस्टर ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ने प्रकाशित केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओच्या ‘नीरजा’ या आगामी चरित्रपटात सोनम कपूर उड्डाणसेविका नीरजा भानोत यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
५ सप्टेंबर १९८६ ला मुंबईहून उड्डाण केलेल्या ‘पॅन अ‍ॅम फ्लाइट ७३’ या विमानाचे अपहरण करून ते कराचीत उतरवण्यात आले होते. नीरजा भानोत ही २३ वर्षांची तरुणी त्या विमानात वरिष्ठ उड्डाणसेविका म्हणून काम करत होती. त्या प्रसंगाला तोंड देणाऱ्या नीरजाला प्रवाशांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवावा लागला होता. नीरजा भानोत यांची वास्तव कथा मांडणाऱ्या ‘नीरजा’ या चित्रपटाची निर्मिती फ ॉक्स स्टार स्टुडिओ करणार असून नीरजाच्या भूमिकेसाठी सोनम कपूरची निवड करण्यात आली आहे.
‘पॅन अ‍ॅम फ्लाइट ७३’ या विमानाचे चार अतिरेक्यांनी अपहरण के ले होते. कराचीत विमान उतरवल्यानंतर १७ तासांनी अतिरेक्यांनी विमानात गोळीबार सुरू केला आणि स्फोट घडवून आणले. नीरजा भानोत यांनी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडून लोकांना बाहेर काढले. विमानाचा दरवाजा उघडल्यानंतर ती स्वत: पहिल्यांदा उडी मारून आपला जीव वाचवू शकली असती. मात्र, तिने तसे न करता लोकांना बाहेर पडण्यास मदत केली. त्याच वेळी तीन लहान मुलांना बंदुकीच्या गोळ्यांपासून वाचवण्यासाठी तिने स्वत:च्या शरीराची ढाल केली. नीरजा भानोतला मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. नीरजाची ही शौर्यकथा रुपेरी पडद्यावर येणार असून प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक राम मधवानी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाबद्दल कोणतीही घोषणा फॉक्सने केलेली नाही. मात्र, सोनम क पूरचे नीरजाच्या व्यक्तिरेखेतील कॉमिक पोस्टर प्रदर्शित करून चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.

Story img Loader