‘साँवरिया’ चित्रपटातून सोनम कपूर आणि रणबीर कपूर या दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘साँवरिया’ फारसा चालला नाही. मात्र सोनमच्या दिसण्याचे आणि रणबीरच्या अभिनयाचे कौतुक झाले. पण बॉलिवूडमधील बडय़ा कलाकारांची मुले असली तरी पहिला चित्रपट पडल्यानंतर दुसरा मिळविणे इतके सहजसोपे नसते याची प्रचीती आल्यानंतर दोघेही अपयशाचे खापर एकमेकांवर फोडून मोकळे झाले. तेव्हापासून त्यांच्यात सुरू झालेला वाद गेल्या आठवडय़ात झालेल्या अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत संपला.
आपला पुतण्या अर्जुन कपूरसाठी अनिल कपूरने वाढदिवसाची खास जंगी पार्टी आयोजित केली होती. तिथेच पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: सोनम उभी होती. पाहुण्यांच्या या गर्दीत अनपेक्षितपणे रणबीर कपूर समोर आल्यानंतर बाकीच्यांच्या नजरा त्या दोघांवर स्थिरावल्या. पण बॉलिवूडमध्ये मैत्री आणि शत्रुत्वही फार काळ टिकत नाही म्हणतात. रणबीर आणि सोनम दोघांनीही हसतखेळत एकमेकांशी बोलणे सुरू केले. आणि जणू काही घडलेच नव्हते या थाटात सुरू झालेल्या त्यांच्या गप्पा पाहून त्यांच्यातले भांडण मिटल्याची उपस्थितांना खात्री झाली.
साँवरिया तिकीटबारीवर अपयशी ठरल्यानंतर सोनम कपूर सेक्सी दिसत नाही, अशी टीका रणबीर कपूरने केली होती. त्याकडे सोनमने एकवेळ दुर्लक्षही केले असते. पण ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये रणबीरने पुन्हा एकदा तोच सूर आळवला तेव्हा सोनम भडकली. तिने रणबीर स्वत:ला सेक्सी समजत असेल तर तसे अजिबात नाही असे म्हणत त्याच्यावर उलट तोफ डागली होती. त्या वेळी रणबीर दीपिकाबरोबर तर सोनमचे दिग्दर्शक पुनित मल्होत्राबरोबर अफेअर सुरू होते. रणबीरला आपण कधीच माफ करणार नाही, असे तिने त्या वेळी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. हे भांडण रणबीरने सुरू केले आहे त्यालाच ते मिटवावे लागेल हा तिचा हट्ट बहुधा मधल्या काळात रणबीरने पूर्ण केला असावा. म्हणूनच अर्जुनच्या वाढदिवसाला ‘साँवरिया’ची ही जोडी हसतखेळत एकत्र आलेली दिसली.

Story img Loader