बॉलीवूड गायक सोनू निगम हा सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी गायकांपैकी एक आहे. पण सोनूने गेल्या अनेक दिवसांपासून स्वत:ला चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवले आहे. सोनू बऱ्याच दिवसांपासून मुंबईत नसून दुबईत आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. सोनू सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आजकाल संगीत दिग्दर्शक ज्या पद्धतीने काम करतात ते त्याला आवडत नाही आणि ज्या प्रोजेक्टसाठी त्याला ऑडिशन द्यावे लागेल असे प्रोजेक्ट्स त्याला घ्यायचे नाही असे त्याने सांगितले आहे.
सोनूने नुकतीच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सोनू म्हणाला, “आजकाल एकच गाणं बऱ्याच गायकांच्या आवाजात रेकॉर्ड केलं जातं आणि त्यानंतर चित्रपटात कोणतं गाणं ठेवायचं हे निर्माता, अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक ठरवतात.” याविषयी सोनू म्हणाला, “त्याला या ‘स्वयंवर’ सारख्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही.” सोनूने नुकतंच आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’साठी एक गाणं रेकॉर्ड केलं आहे.
या चित्रपटासाठी गाणं का रेकॉर्ड केलं याबाबत स्पष्टीकरण देत सोनू म्हणाला, रेकॉर्डिंग करण्याआधी संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी त्याला फक्त गाणं रेकॉर्ड करू असे आश्वासन दिले होते. दरम्यान या आधी सोनू आणि प्रीतममध्ये दुरावा तेव्हा आला होता जेव्हा प्रीतमने एका गाण्यातून सोनूला काढत दुसऱ्या गायकाकडून ते रेकॉर्ड करून घेतले होते. तर आता आमिर खाननेच सोनूला गाणं रेकॉर्ड करण्यास सांगितल्याने त्याने हे गाणं रेकॉर्ड केलं.
आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
सोनू पुढे म्हणाला, त्याला कामासाठी कोणत्याही निर्माता किंवा संगीत दिग्दर्शकाच्या मागे धावण्याची इच्छा नाही. त्याच्या चाहत्यांना अभिमान वाटला पाहिजे की तो कामासाठी भीक मागत नाही. सोनू म्हणाला, ‘सोनू आपल्या समोर राजासारखा फिरतो, पण तो प्रत्यक्षात भिकारी आहे, असे त्याच्या चाहत्यांना कळले तर त्यांना कसं वाटेल.
Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?
सोनूने ९० च्या दशकात त्याच्या गाण्याच्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने बॉलिवूडमधील सगळ्या मोठ्या कलाकारांसाठी गाणी गायली आहेत. एवढंच काय तर सोनूचे अल्बमही प्रचंड लोकप्रिय होते. अलीकडेच भारत सरकारने सोनूला पद्मश्री पुरस्कार देत त्याचा गौरव केला होता.