संपूर्ण जगाला करोना विषाणूने त्रस्त केलंय. या विषाणूला निपटण्यासाठी देशात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे आहे. नुकताच गायक सोनू निगमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओमध्ये सोनू निगम चेहऱ्यावर मास्क न लावता रक्तदान करताना दिसून येतोय. अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या टीका करणाऱ्या कॅप्शन लिहून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केलाय.

तर झालं असं की, गायक सोनू निगम नुकतंच मुंबईतल्या जुहू इथे आदर्श फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचं उद्घाटन करण्यासाठी गेला होता. या रक्तदान शिबीराचं उद्घाटन केल्यानंतर त्याने स्वतः पुढाकार घेत रक्तदान ही केलं. इतकंच नाही तर त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आणि करोना लस घेण्याअगोदर रक्तदान ही करा, असं आवाहन देखील त्याने केलं.

हा व्हिडीओ शेअर करताना गायक सानू निगमने कॅप्शनमध्ये लिहिलं, ” सध्याची परिस्थिती पाहता भारतात येणाऱ्या काही दिवसांत रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे…यासाठी आताच सावध व्हा आणि लस घेण्याअगोदर रक्तदान आवर्जुन करा, जे करोनाला हरवून बरे झाले आहेत त्यांनी सुद्धा लस घेण्यापुर्वी रक्तदान नक्की करा.”

या रक्तदान शिबीरातले गायक सोनू निगमचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे फोटोज आणि व्हिडीओज पाहून नेटकऱ्यांनी त्याने घेतलेल्या या पुढाकाराबाबत कौतूक तर केलंच आहे, परंतू काही नेटकऱ्यांनी तर त्याला चांगलंच ट्रोल केलंय. या ट्रोलिंगचं कारण म्हणजे त्याने चेहऱ्यावर मास्क न लावणं हे आहे.

सुरवातीला या व्हिडीओमध्ये गायक सोनू निगम चेहऱ्यावर मास्क लावून उद्घाटन करताना दिसून येतोय, लोकांशी गप्पा मारतानाही त्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसतोय, मात्र जेव्हा तो रक्तदान करतो त्यावेळी त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही.

यामूळेच सध्या गायक सोनू निगम नेटकऱ्यांचा टार्गेट बनलाय. काही जण याला सोनू निगमचं शो ऑफ म्हणून बोलतंय, तर काही जण याला ‘कुणीतरी मास्क दान करा’, अशी कमेंट करत ट्रोल करतंय.

Sonu nigam trolled 2
(Photo Credit: Instagram)

विशेष म्हणजे गायक सोनू निगमला काही दिवसांपूर्वीच करोना झाला होता. या व्हिडीओमध्ये तो स्वतः करोना झाल्याचं सांगताना दिसून येतोय. तरी सुद्धा त्याला अद्याप चेहऱ्यावर मास्क लावण्याबाबत गांभिर्य नसल्याचं दिसून आलं.