गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांत कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गाताना दिसू लागलेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम यांचे नावही ह्या यादीत समाविष्ट आहे. “हिरवा निसर्ग…” या लोकप्रिय गाण्यापासून ते अगदी हल्लीच्या “टिक टिक वाजते… ” या त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. ‘स्विस एंन्टरटेण्मेंट’ची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या आगामी अजय फणसेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘चीटर’ या सिनेमात सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमात दोन मराठी गाणी गायली आहेत. मुंबई येथील एका स्टुडिओमध्ये गायक सोनू निगम यांच्या आवाजात दोन गाणी रेकॉर्ड करून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.
गेली ७-८ वर्ष सोनू निगम यांच्या शोजमध्ये विविध प्रकारची ताल वाद्य वाजविणाऱ्या अभिजित नार्वेकर ह्या तरुणाने या सिनेमासाठी संगीत दिले असून त्याचा हा संगीतकार म्हणून पहिलाच सिनेमा आहे. मी जेव्हा एका मराठी सिनेमासाठी संगीतकार म्हणून काम पाहणार असल्याचे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना सांगितले तेव्हा त्यांनी स्वतःहून मला तुझ्यासाठी गायला नक्की आवडेल असे सांगितले. त्या क्षणी मला आनंदाचा सुखद धक्का बसला.पहिलाच सिनेमा आणि त्यासाठी सोनूजी गाणार ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. एक गाणे रेकॉर्ड करून झाल्यावर मी त्यांना दुसऱ्या गाण्याबद्दल बोललो आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता दुसऱ्या गाण्यासाठीही लगेच होकार दिला. दोन्ही गाणी ड्यूएट असून गायिका आनंदी जोशीने त्यांच्यासोबत ही दोन्ही गाणी गायली आहेत. अखिल जोशी यांनी या सिनेमातील चारही गाणी लिहिली असून ही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. मला या सिनेमासाठी संगीतकार म्हणून पहिली संधी दिल्याबद्दल मी अजय फणसेकर यांचा आभारी असल्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर यांनी आवर्जून नमूद केले.
“चीटर” या सिनेमाच्या एकंदरीत नावावरूनच आपल्याला सिनेमाचा विषय लक्षात येतोच पण त्याचसोबत या सिनेमातील अजून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून लक्ष्मण बुवा हे या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहणार आहेत. अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचे शुटींग मॉरिशियस येथे सुरु झाले असून उर्वरित काही चित्रीकरण वाई येथे पार पडणार आहे.
“चीटर” चित्रपटात सोनू निगमची दोन मराठी गाणी
गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांत कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गाताना दिसू लागलेत.
First published on: 30-01-2015 at 04:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu nigams two song in marathi movie cheater