करोना संकटाच्या काळात विविध पद्धतीने गरजुंना मदत करणाऱ्या सोनूने विदेशात अडकलेल्या १५०० विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणलं आहे. भारतातील जवळपास ३ हजार विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेत असून करोना संकटामुळे हे विद्यार्थी तेथेच अडकले होते. या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला सोनूने भारतात परत आणलं आहे. ट्विट करत सोनूने ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी सोनूने एक पोस्ट शेअर करत किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या ३ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी घेऊन येणार असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, त्याने या स्पाइस जेटच्या मदतीने यातील १५०० विद्यार्थ्यांना भारतात आणलं आहे. यातील काही फ्लाइट्स गुरुवारी रात्री उशीरा वाराणसी विमानतळावर पोहोचल्याचं त्याने सांगितलं.

“आज खूप आनंद होतोय किर्गिस्तान ते वाराणसी हे पहिलं उड्डाण यशस्वी झालं. स्पाइस जेटचे मनापासून आभार. माझ्या कामात माझी साथ दिल्यामुळे मनापासून आभार. या पहिल्या उड्डाणानंतर दुसरी फ्लाइट २४ जुलै रोजी पुन्हा उर्वरित विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाईल. किर्गिस्तानमध्ये असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा”, असं ट्विट सोनूने केलं आहे.


याविषयी स्पाइसजेटनेदेखील एक ट्विट केलं होतं. “हा खरंच एक हेतिहासिक दिवस आहे. खऱ्या आयुष्यातील हिरो सोनू सूदसोबत स्पाइट जेटचं विमान किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या १५०० विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याच्या नव्या कामगिरीसाठी निघालं आहे. पहिले ९ विमानं दिल्लीतून किर्गिस्तानच्या दिशेने रवाना झाले आहेत”.

दरम्यान, करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे किर्गिस्तान येथे शिक्षणासाठी गेलेले जवळपास ३ हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे बिहार-झारखंड येथील आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सोनू सूद प्रयत्न करत आहे.