बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, दिशा पटानी आणि जॅकी चॅन यांच्या चित्रपटाने भलेही भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाल दाखविली नसली तरी चीनमध्ये या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाने चीनमध्ये जवळपास १७९ मिलियन डॉलर कमाई केली आहे. १७९ मिलियन डॉलरचे भारतीय मुल्यात रुपांतरण केल्यास हा आकडा जवळपास १२०० कोटी इतका होतो. भारतात आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाने इतकी कमाई केलेली नाही. यासंबंधीचे वृत्त जनसत्ताने दिले आहे.

जॅकी चॅनने स्वतः भारतात येऊन या चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. तरीही ‘कुंग फू योगा’ चित्रपटाने भारतात केवळ चार कोटींची कमाई केली. भलेही हा चित्रपट भारतात चालला नाही पण, ‘दबंग’मध्ये सलमानसोबत काम करणारा सोनू निदान आपण १००० कोटीच्या क्लबमध्ये गेलो या विचारानेच सुखावला असेल. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिक्रिया पाहून सोनू खूप खुश झाला आहे. चित्रपट समीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने जगभरात १८० मिलियन डॉलर म्हणजेच १२०० कोटींची कमाई केली आहे. ‘कुंग फू योगा’ चित्रपट भारतात ३ फेब्रुवारीला तर चीनमध्ये २८ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. ५ फेब्रुवारीपर्यंत चित्रपटाने ९४३ कोटींची कमाई केली होती. ‘कुंग फू योगा’ चित्रपटाची ही कमाई पाहता सोनू सूदने तर बॉलीवूडच्या खान अभिनेत्यांनाही मागे टाकले आहे.

‘कुंग फू योगा’ चित्रपटाची सिरीज तयार व्हायली हवी असे अभिनेता सोनू सूदचे मत आहे. बुधवारी सोनू सूदने बुटांची कंपनी असलेल्या ‘स्केचर्स गोफ्लेक्स वॉक रेंज’च्या लाँचला हजेरी लावली होती. त्यावेळी तो म्हणालेला की, मला या वेंचरला (‘कुंग फू योगा’) अजून पुढे न्यायचे आहे. याविषयी मी दिग्दर्शक स्टॅनली टोंग यांच्याशी देखील बोललो होतो आणि त्यांना ही कल्पना फार आवडली होती. आम्ही ‘कुंग फू योगा २’ बनवण्याचा विचार करत आहोत. ‘कुंग फू योगा’ची सिरीज बनायला हवी. जॅकी चॅनच्या आयुष्यातील हा सर्वाधिक हिट ठरलेला चित्रपट आहे. जगभरात चित्रपटाने १००० कोटीपेक्षाही जास्त कमाई केलीय, असे सोनू म्हणाला. ‘कुंग फू योगा’ ची कथा स्टॅनली टोंग यांनी लिहली असून त्यांनीच याचे दिग्दर्शनही केले आहे.