करोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या काळात चर्चेचा विषय ठरलेली व्यक्ती म्हणजे अभिनेता सोनू सूद. लॉकडाऊनच्या काळात लोकांना लागेल ती मदत करणं, त्यांना घरी पोचवणं, लसीकरणाची मोहिम अशा अनेक गोष्टींमुळे सोनू कायम चर्चेत आहे. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे. आणि कारण आहे ऑफलाईन होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा!
करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत आहे. अशा परिस्थितीतही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन होणार हेच चित्र दिसत आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नाही. या वर्षी बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू आता सोनू सूदने घेतली आहे.
I request everyone to support students who are forced to appear for offline board exams in these tough times. With the number of cases rising to 145k a day I feel there should be an internal assessment method to promote them rather than risking so many lives. #cancelboardexam2021 pic.twitter.com/Taq38B0811
— sonu sood (@SonuSood) April 11, 2021
त्याने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “अशा कठीण परिस्थितीतही ऑफलाईन परीक्षांना सामोरे जाणाऱ्या बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची मी सर्वांना विनंती करतो. सध्या देशात रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना जीव धोक्यात घालून परीक्षा देण्यापेक्षा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना निकाल द्यावा.”
त्याने बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणीही केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने ही मागणी करत असल्याचंही तो म्हणतो. त्याने या व्हिडिओमध्ये सौदी अरेबिया, मेक्सिको या देशांची उदाहरणेही दिली आहेत, ज्यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्या.
हेही वाचाः लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून सोनू सूद देणार भारतीयांना ‘संजीवनी’
सोनूने सर्वांना पुढे येऊन या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही केले आहे. सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात चांगलाच चर्चेत आला. त्याने आपली मुंबईतली जमीनही गरजूंसाठी उपलब्ध करून दिली. आपलं आयुष्य आणि आलेले अनुभव याबद्दल सांगणारं आत्मचरित्रही त्याने गेल्या वर्षी प्रकाशित केलं आहे. ‘आय एम नो मसिहा’ असं याचं नाव आहे.