सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या ही तुलनेने कमी झाली आहे. मुंबईत सध्या 10 हजारांच्या आसपास इतके कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. करोना काळात अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेत अनेकांना गरजूंना मदत केली. पहिल्या लॉकडाउनच्या वेळी त्याने शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. मदतीचे हे कार्य त्याने अविरतपणे चालू ठेवत दुसऱ्या लॉकडाउनमध्ये देखील तो लोकांना मदत करताना दिसून आला. देशातील करोनासारख्या संकटकाळात हातावर पोट असलेल्या लोकांचा विचार करून करोना नियम तोडावे लागतात, असं अभिनेता सोनू सूदने म्हटलंय.
अभिनेता सोनू सूदने ‘इंडियन एक्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही मागणी केलीय. या मुलाखतीत त्याने करोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत लोकांना मदत करताना आलेला अनुभव व्यक्त केला. एक अभिनेताच्या भूमिकेपेक्षा समाजसेवकाच्या रूपातून जास्त प्रसिद्धी मिळाल्याबाबत त्याला प्रश्न करण्यात आला. करोना काळात इतकी प्रसिद्धी मिळेल, याची अपेक्षा होती का? असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेता सोनू सूद अगदी प्रामाणिक उत्तर देताना दिसला. तो म्हणाला, “करोना काळात लोकांची मदत करताना मला जो आनंद मिळाला तो अभिनयाच्या १९ वर्षाच्या करिअरपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. दीड वर्षापूर्वी जेव्हा मी मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदतीला सुरवात केली त्यावेळी पुढे जाऊन मी इतक्या गरजूंचे जीव वाचवू शकेल, असा विचार देखील मनात आला नव्हता.”
यावेळी त्याने करोनाच्या पहिल्या लाटेतील आठवणी सांगताना म्हणाला, “ज्यावेळी मी मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करत होतो, त्यावेळी अनेक परवानग्या आणि नियमांचा विचार करावा लागला होता. जरी तुम्ही ३०० लोकांना स्थलांतर करत आहात तर त्या ३०० लोकांची करोना चाचणी देखील करणं गरजेचं होतं. त्यातही कोणी बांद्रा तर कोणी अंधेरीत राहणारे होते. त्यामूळे त्यांच्या स्थानिक पोलिस स्टेशनमधून प्रवास करण्यासाठीची परवानगी मिळवणं हे देखील आलं होतं. ही एक खूप मोठी प्रक्रिया होती. अशा परिस्थितीत प्रोटोकॉल आणि काही नियम तोडावे लागतात.”