बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सोनूची बहिण मालविका सूदने आता कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याविषयी सोनू सूदने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. दरम्यान, बहिणीसाठी निवडणूक प्रचार करणार नसल्याचं सोनूने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सोनूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सोनूने मालविकासोबत २ फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “माझी बहीण मालविका सूद तिच्या राजकीज प्रवासाला सुरुवात करत आहे. माझ्या शुभेच्छा तिच्यासोबत आहेत आणि तिच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायाला पाहण्याची प्रतीक्षा मी करू शकत नाही. मालविकाला शुभेच्छा! एक अभिनेता म्हणून माझे काम आणि समाजकार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तकक्षेप आणि व्यत्ययायाशिवाय चालू राहिल”, असे कॅप्शन सोनूने दिले.
या सगळ्यात सोनूने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अशातच बहिणीसाठी निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं. “तिने धाडस केलं याचा मला अभिमान वाटतो. ती गेल्या काही वर्षांपासून तिथे राहत आहे आणि तिला तिथल्या लोकांच्या समस्या माहित आहेत. ती लोकांच्या संपर्कात राहून त्यांना मदत करू शकेल, याचं मला समाधान आहे”, असे सोनू म्हणाला.
पुढे बहिणीसाठी प्रचार करणार का, “असा प्रश्न विचारला असता सोनू म्हणाला, “हा तिचा प्रवास आहे आणि माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी जे काम करत आलो आहे तेच करत राहीन. मी निवडणुकीत तिच्यासाठी प्रचार करणार नाही कारण तिने मेहनत करावी अशी माझी इच्छा आहे. जर माझं बोलायचं झालं तर, मी नेहमीच राजकारण किंवा कोणत्याही राजकीय संलग्नतेपासून दूर राहीन.”