|| गायत्री हसबनीस
‘सोनी वाहिनी’वरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून जिजामाता यांची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई झ्र मायेचे कवच’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्ताने भार्गवीने दूरचित्रवाणीतले बदल, या माध्यमावरील पुन:पदार्पण आणि मालिकेत तिने रंगवलेली कणखर स्त्री व्यक्तिरेखा याबद्दल आपला अनुभव सांगितला.
मालिकेतही काम करताना काही वेगळ्या भूमिकेतून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न भार्गवी सातत्याने करत आली आहे. तिची नवीन मालिकाही वास्तव विषयावर आधारित असल्याचे तिने स्पष्ट केले. ‘‘या मालिकेचा विषय हा आजच्या तरुण पिढीचे वास्तव चित्रण करणारा आहे. कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह वाटतील अशी दृश्ये किंवा आशय न मांडता सगळ्यांना सहजपणे समजेल आणि प्रश्नाचं गांभीर्य कळेल, अशा पद्धतीने चित्रण करण्याचा प्रयत्न मालिकेतून करण्यात आला आहे. दूरचित्रवाणीवर काही प्रमाणात सेन्सॉरचे बंधन असल्याने चांगले, धाडसी विषयही सगळे कुटुंब बसून एकत्रित पाहू शकेल, अशा निखळ पद्धतीने मांडण्याची संधी निर्माता-दिग्दर्शकांना मिळते. वास्तववादी विषयही समाजभान राखून मालिकेतून चांगल्या रीतीने मांडले जाऊ शकतात,’’ असे भार्गवी सांगते.
बेधडक तसेच धाडसी विषय प्रेक्षक आता परिवारासोबत पाहू शकतील इतकी प्रगल्भता येऊ लागली आहे किंबहुना आली आहे असे मत मांडत दूरचित्रवाणीच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या जाऊ शकतात असे आपले स्पष्ट मत असल्याचे ती सांगते. मराठी मालिकांच्या कथेत खोटेपणा नाही, असं ती ठामपणे सांगते.
आपला पती परस्त्रीशी संबंध ठेवून आहे. त्यातही त्याच्या दुराव्यामुळे आलेले एकटेपण पदरी असले तरी आपली मुलगी आपल्या सोबत आहे आणि आपण तिच्या पाठीशी आहोत, याच घट्ट नात्यामुळे एकट्या पालकाची भूमिका निभावत असलेल्या भार्गवीला मीनाक्षी या तिच्या व्यक्तिरेखेबद्द्ल काय वाटते हे ती विस्ताराने सांगते. या मालिकेतील मीनाक्षी एका वयात येणाऱ्या मुलीची आई आहे. त्यात मीनाक्षी स्वत:ही काही प्रमाणात जिद्दी, हट्टी आहे; पण तसे असण्यामागेही तिचे काही एक कारण आहे. मीनाक्षी जशी हट्टी आहे तशीच ती आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणारी आहे. वास्तवात आपणही तसेच आहोत, असे ती म्हणते. ठरवून कोणी कोणाशी वाईट अथवा चांगले वागत नाही, कारण सगळ्यांमध्ये मिश्र स्वभावछटा असतात. परिस्थितीनुसार, आपापल्या विचाराप्रमाणे आपण वागत असतो. मुळात चांगले किंवा वाईट या संकल्पनाच व्यक्तिसापेक्ष असतात, असे ती सांगते. मात्र अनेकदा माझं तेच खरं या भूमिकेमुळे नात्यांवर परिणाम होऊ शकतो, हे या मालिकेतून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे ती स्पष्ट करते. आई निश्चितच आपल्यासाठी अनन्यसाधारण असते, आपण तिला अनेक विशेषणांनी सन्मानित करतो. हे जितकं खरं आहे तेवढंच हेही खरं आहे की, आईही शेवटी एक माणूस आहे. तिचाही एखादा निर्णय चुकू शकतो. आपल्या पाल्याबद्दल किंवा संसाराबद्दल तिच्याकडूनही काही चूक होऊ शकते हे आपण मान्य करायला कुठे तरी कमी पडतो आणि जरी ती चुकली तरी आपल्या पाल्याला, कुटुंबाला सावरण्यासाठी त्यातूनही बाहेर पडून ती योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न करते हे या मलिकेतून प्रेक्षकांना दाखवायचे आहे, अशी माहिती तिने दिली.
‘‘आम्ही या मालिकेतून सच्चेपणा दाखवला आहे. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार किंवा निवडीनुसार एकट्या आईची भूमिका अनेक स्त्रिया आज निभावत आहेत. या स्त्रिया आपल्या मुलांच्या बाबतीत खूप हक्क गाजवतात, असे आपल्याला वाटू शकते. दुसरे म्हणजे आपण जे भोगले ते आपल्या मुलांना सहन करावे लागू नये यासाठी त्या जास्तच काळजी घेताना दिसतात. आम्हाला येणाऱ्या प्रतिक्रियांना उत्तर देताना आम्ही हेच सांगतो की, आई मुलीच्या नात्यात विश्वास हवाच, कारण या मालिकेत आईची भूमिका संरक्षकाची आहे. आपल्या मायेच्या सुरक्षित छायेत मुलीने असावे ही आईची सहजभावना आहे. या गोष्टी लक्षात घेऊन लेखक पराग कुलकर्णी यांनी खूप छान दृश्ये लिहिली आहेत. एकेरी पालकत्व सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या समस्या वास्तविक लेखणीतून त्यांनी उतरवल्या आहेत, अशा शब्दांत तिने मालिकेच्या लेखनाचे कौतुक केले.
‘‘वास्तवाच्या अधिक जवळ जाणारे आणि माझ्या विचारधारेशी – राहणीमानाशी जोडणारे पात्र असेल, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या पात्राच्या माध्यमातून समाजापर्यंत ठोस विचार पोहोचवता येत असेल, असे पात्र रंगवायला मला मनापासून आवडते. त्यामुळे अशाच वास्तवादी, पण चांगल्या भूमिकेच्या शोधात मी होते आणि त्याच वेळी मला ‘आई – मायेचे कवच’ या ‘कलर्स मराठी’वरील मालिकेबद्दल विचारणा झाली. ज्या भूमिकेच्या शोधात मी होते ती मला मिळाली याचा प्रचंड आनंद झाला. दोन पिढ्यांमधील द्वंद्व यात चित्रित केले गेले आहे. ही पिढी खूप हुशार आहे. आपण त्यांना नावं ठेवूच शकत नाही. प्रलोभने खूप वाढली आहेत; पण ही पिढी ध्येयकेंद्रित आहे. आजची पिढी बंडखोर आहे, धाडसी आहे,’’ असे प्रामाणिक मत मांडत आपण त्यांच्या कलाने घेत त्यांना योग्य मार्ग दाखवला तर आपण एक चांगली पिढी घडवू शकतो, अशी आशादेखील भार्गवीने व्यक्त केली.