टीव्ही वाहिन्यांना टीआरपीची तारेवरची कसरत ही रोजचीच आहे. त्यामुळे प्रत्येक वाहिनीमध्ये त्यांच्या मालिकांबाबत शर्यत सुरूच असते. त्यात काही वाहिन्या तग धरून राहतात, तर काहींचा निभाव लागू शकत नाही. अशीच काहीशी परिस्थिती ‘सोनी पल’ वाहिनीची झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दिमाखात सुरू झालेली ही वाहिनी पाच महिन्यांतच अपयशी ठरली असून वाहिनीतर्फे पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या टीव्हीच्या क्षेत्रामध्ये वाहिन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये प्रत्येक समूह त्यांच्या नव्या वाहिन्या घेऊन येण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी ‘झील समूहा’ची ‘झिंदगी’, ‘एमएसएल समूहा’ची ‘सोनी पल’, आणि ‘एपिक चॅनल’ या तीन वाहिन्या या स्पर्धेमध्ये नव्याने उतरल्या होत्या. त्यामध्ये पाकिस्तानी मालिका भारतात घेऊन येण्याच्या प्रयत्नात असलेली ‘झिंदगी’ वाहिनी बऱ्यापैकी यशस्वी ठरली होती. पाकिस्तानी मालिकांमधील वेगळे विषय, नवे चेहरे यामुळे कॉलेज कट्टय़ांवर आणि घराघरांमध्ये या वाहिनीच्या मालिकांची बरीच चर्चा झाली. तर भारताच्या इतिहासावर आधारित ‘एपिक वाहिनी’ही हळूहळू लोकांची पकड घेताना दिसत आहे. परंतु ‘सोनी पल’ वाहिनीला मात्र लोकांची मने जिंकण्यासाठी त्या तुलनेत बरेच प्रयत्न करावे लागले. वाहिनीवरील ‘सिंहासन बत्तिसी’ ही पौराणिक मालिका वगळता ‘एक रिश्ता ऐसा भी’, ‘ये दिल सून रहा है’, ‘हमारी सिस्टर दीदी’ या मालिका लोकांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेमध्ये मागे राहिली होती. मध्यंतरी वाहिनीवरील कित्येक मालिका कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आल्या होत्या. सध्या वाहिनीवर ‘सिंहासन बत्तिसी’ वगळता ‘सोनी’ आणि ‘सब टीव्ही’ वाहिन्यांवर पूर्वी गाजलेल्या मालिका पुन्हा दाखविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात वाहिनीतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातून समोर आलेल्या निकषांवरून वाहिनीची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे वाहिनीच्या सूत्रांतर्फे सांगण्यात आले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा