उत्तर प्रदेशातल्या राजकारणावर आधारित रिचा चड्ढा स्टारर पॉलिटिकल फिल्म ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ नंतर आता दिग्दर्शक सुभाष कपूर यांची बिहारच्या राजकारणावर ‘महाराणी’ ही नवी वेब सिरीज भेटीला येतेय. सोनी लिव प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज झालेल्या या सिरीजमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी टायटल कॅरेक्टरमध्ये झळकणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलाय.
या ट्रेलरमध्ये राणी भारतीचा प्रवास दाखवण्यात आलाय. राणी भारतीची भूमिका अभिनेत्री हुमा कुरेशीने केली आहे. अगदी स्वयंपाकघर पासून ते राजघराण्याची महाराणी पर्यंतचा राणी भारतीचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय. राजघराण्याची ‘महाराणी’ ती स्वखुशीने होत नाही तर परिस्थितीला पाहून तिला हा निर्णय घ्यावा लागतो, असं दाखवण्यात आलंय.
सोशल मीडियावर हा ट्रेलर रिलीज करताना कॅप्शन देखील लिहिण्यात आलीय. यात त्यांनी लिहिलंय, “९० च्या दशकातलं एक पॉलिटीकल ड्रामा, ज्यात परंपरेच्या जोखडातून एक आवाज उभा राहतो. एक अशिक्षित महिला कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीचा सामना करेत, ‘महाराणी’ वेब सिरीज २८ मे रोजी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.”
A political drama set in the 90’s where among the traditional satraps there was an emerging voice. How will an illiterate woman survive this?#Maharani – Streaming on 28th May #SonyLIV pic.twitter.com/gAQ9Vp8TiK
— SonyLIV (@SonyLIV) May 20, 2021
‘महाराणी’ या वेब सिरीजचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीची भूमिका बिहारच्या राजकारणातील दिग्गज नाव लालु प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांच्याशी मिळतीजुळती आहे. कुटूंबाच्या जबाबदारीमध्ये गुंतलेल्या राणीला एक दिवस अचानक राज्याच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसवण्यात येतं.
या सिरीजमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या व्यतिरिक्त सोहम शाह, अमित सियाल, कानी कुश्रुती, विनीत कुमार आणि इनामुल हक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता सोहम शाह या सिरीजमध्ये मुख्यमंत्री आणि राणी भारतीच्या पतीची भूमिका साकारतोय. याअगोदर अभिनेत्री हुमा कुरेशीची हॉलिवूड फिल्म ‘आर्मी ऑफ द डेड’ प्रदर्शित होणार आहे. येत्या २१ मे रोजी नेटफ्लिक्सवर ही फिल्म रिलीज होणार आहे.
याअगोदर ‘महाराणी’ सिरीजचा टीझर रिलीज करण्यात आला होता. यातील एका डायलॉगवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सोनी लिवने त्या डायलॉगला काढून टाकलं होतं. याबाबत सोनी लिवने सोशल मीडियावर देखील माहिती दिली होती.