अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात आरोपी असलेला अभिनेता सूरज पंचोलीने मुंबईतील विशेष सीबीआय नायालयात जिया खानच्या आईविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. सूरज पंचोलीने आपले वकील प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून तसा अर्ज केला आहे. जिया खानची आई राबिया खान हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूरज पंचोलीने आपल्या अर्जात म्हटले आहे.
हेही वाचा >>> कंगना- कियाराला मागे टाकत ‘ही’ ठरली Google वर सर्वाधिक सर्च झालेली अभिनेत्री
सूरज पंचोलीने राबिया खान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावे अशी मागणी केली आहे. तसेच राबिया या न्यायालयाने बजावलेले समन्स टाळत आहेत. विशेष सीबीआय कोर्टात त्या गैरहजर राहत आहेत, असा दावा सूरज पंचोलीने आपल्या अर्जात केला आहे. “या खटल्यातील मूळ तक्रारदाराला अनेक वेळा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र राबिया खान आपले म्हणणे मांडण्यासाठी कोर्टासमोर हजर झालेल्या नाहीत. मूळ तक्रारदार न्यायालयाला सहकार्य करत नसल्याचे दिसत आहे. तसेच हा खटला लांबावा म्हणून त्या कोर्टासमोर हजर राहण्याचे टाळत आहेत,” असे पंचोलीने आपल्या अर्जात म्हटले आहे.
हेही वाचा >>> ‘कॉफी विथ करण ७’ चा प्रोमो झाला प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार भेटीला
पंचोलीच्या पत्रानंतर न्यायाधीश एएस सय्यद यांनी सीबीआयला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसेच या खटल्याची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. फेब्रवारी २०२२ पासून कोर्ट राबिया यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवत आहे. अद्याप राबिया कोर्टासमोर हजर झालेल्या नाहीत. या खटल्यात आतापर्यंत १४ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला असून आणखी काही साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी आहे.
हेही वाचा >>> पापाराझींना कसं कळतं की सेलिब्रिटी कधी आणि कुठे असणार आहेत? मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने दिले उत्तर
दरम्यान, २०१३ साली अभिनेत्री जिया खान यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून जुहू पोलिसांनी जिया यांचा प्रियकर सूरज पांचोलीला ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून जिया खान यांच्या मृत्यूप्रकरणाचा खटला कोर्टासमोर सुरु आहे.