‘जियाने सूरजकडून आपल्याला जसे प्रेम हवे होते तसे कधीच मिळाले नाही, असे म्हटले आहे. जियाचे सूरजवर खूप प्रेम होते आणि त्यानेही आपल्यावर असेच भरभरू न प्रेम करावे अशी तिची अपेक्षा होती. मात्र, तसे करण्यास सूरज असमर्थ ठरला. जियाला खरेतर एका समजूतदार जोडीदाराच्या प्रेमाची गरज होती. आणि ते पाहता माझा मुलगा तिच्या योग्यतेचा नव्हता’, अशी प्रांजळ कबुली अभिनेत्री झरीना वहाब यांनी प्रसिध्दमाध्यमांसमोर दिली. जियाच्या मृत्यूनंतर तिची आई राबिया खानची भेट घेण्यासाठी झरीना वहाब तिच्या घरी गेल्या होत्या. आपण कुठल्याही प्रकारे सूरजची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने राबिया खान यांची भेट घेतली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सूरज आणि जियाच्या नात्यात तणाव होता, हे मान्य करणाऱ्या झरीना यांनी सूरजने जियाला मारले, हे खरे नसल्याचे सांगितले. सूरजने जियावर कधीही हात उचललेला नाही. एवढेच नव्हे तर ज्या दिवशी जियाने आत्महत्या केली तेव्हा सूरज तिला भेटला होता. त्याने तिला ब्रेक अप बुके पाठवला होता, याही गोष्टी खोटय़ा असल्याचे झरीना यांनी म्हटले आहे. राबिया खान यांनी कितीही ओरड केली तरी जियाच्या आत्महत्येसाठी माझा मुलगा जबाबदार नसून  पोलिसांच्या तपासातून नक्कीच सत्य बाहेर येईल असे त्यांनी सांगितले.

Story img Loader