दाक्षिणात्य दिग्दर्शक विक्रम मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता चियान विक्रम याची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ५६ वर्षीय विक्रमच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्याला तातडीने चेन्नईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर बरेच ट्वीट केले जात आहेत.
काही मीडिया रिपोर्टनुसार चियान विक्रमला हृदयविकाराचा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मात्र डॉक्टर किंवा संबंधित रुग्णालायाच्या व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. चेन्नई येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांपासून चियान विक्रमला ताप येत होता त्यामुळे त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या असंही बोललं जातंय.
आणखी वाचा- Video : हेअर स्टाइलिस्टवर भडकला रितेश देशमुख, ओतलं डोक्यावर पाणी; पाहा नेमकं काय घडलं
विक्रम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू आहे. चाहते त्याची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. यासोबतच विक्रमबाबत चुकीच्या बातम्या पसरवू नका असं आवाहन देखील चाहते करत आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून विक्रम त्याचा आगामी चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन’चं शूटिंग करत होता.
विक्रमच्या कामाबद्दल बोलायचं तर ‘कदारम कोंडन’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातला सुपरहिट ठरला होता. याशिवाय चियान विक्रम अलिकडेच प्रदर्शित झालेल्या कमल हसन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटात पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसला होता. लवकरच त्याचा ‘कोबरा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.