बरेच सिनेरसिक ज्याची आतुरतेने वाट बघत होते त्या पोन्नियिन सेलवन म्हणजेच ‘पीएस १’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दिग्दर्शक मणीरत्नम यांचा हा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्तिच्या कादंबरीवर आधारित १० व्या शतकातल्या चोळ साम्राज्याच्या इतिहासावर बेतलेली असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे की फार मेहनत घेऊन हा गौरवशाली इतिहास लोकांपुढे आणायचा प्रयत्न केला गेला आहे. ट्रेलरमधून चित्रपटातल्या मुख्य पात्रांची ओळखसुद्धा करून देण्यात आली आहे.
चियान विक्रम आदित्य करिकालनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर जयम रवि हा अरुलमोळी वर्मनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, कार्थीसुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे, याबरोबरच राजकुमारी कुंदवईची भूमिका त्रीशा कृष्णन साकारत असून, राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन दिसणार आहे. चित्रपटाचं संगीत ए आर रहमान यांनी दिलं आहे.
आणखी वाचा : PS-1 Trailer : षडयंत्र, युद्ध अन् बलिदान… ऐश्वर्या रायच्या बहुप्रतिक्षीत PS-1 चा दमदार ट्रेलर पाहिलात का?
चेन्नईमध्ये हा ट्रेलर लॉंच सोहळा भव्य पद्धतीत पार पडला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपटाच्या कलाकारांबरोबर दिग्दर्शक मणीरत्नमसुद्धा हजर होते. याबरोबरच सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसनसुद्धा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याच कार्यक्रमादरम्यान कमल हासन यांनी एक खुलासा केला. हा चित्रपट कमल यांना बनवायचा होता आणि त्यात रजनीकांत यांना घ्यायची इच्छा होती. कमल स्वतः यामध्ये आदित्यची भूमिका सकरणार होते. काही कारणास्तव हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण आज मणीरत्नमसारखा दिग्दर्शक हा चित्रपट करत असल्याचा आनंद आहे असंही कमल यांनी स्पष्ट केलं.
कमल हासन सध्या त्यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटावर काम करत आहेत. बऱ्याच करणास्तव त्यांचा हा चित्रपट रखडला होता. शिवाय ‘पीएस १’ हा चित्रपट दोन भागात येणार असून याच्या पहिल्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी तब्बल ५०० कोटी इतका खर्च आल्याचं म्हंटलं जात आहे. शिवाय आयमॅक्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला तामीळ चित्रपट असल्याचंही म्हंटलं जात आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.